पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे आज झालेल्या महानगरपालिका निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी आमदार महेश लांडगे यांना उद्देशून संयम आणि सबुरी राखण्याचा सल्ला दिला.
“निवडणुका आल्या की अनेक जण टीका-टिप्पणी करतात, आरोप करतात. त्यामुळे वैताग येणं स्वाभाविक आहे. पण अशा वेळी सबुरी ठेवा. तुम्ही वैतागू नका, फक्त तुमचं काम लोकांसमोर मांडा,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या भाषणात त्यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका करत म्हटलं की, “समोरच्या लोकांकडे सांगायला काम नाही. म्हणून विकासावर चर्चा न करता वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही निवडणूक वादावर नव्हे, तर विकासावर झाली पाहिजे.”
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हे शहर कष्टकरी, भूमीपुत्र आणि राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या मेहनतीतून उभं राहिलं आहे. “२०१४ नंतर शहराला आधुनिक स्वरूप देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलं असून त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
महापालिकेतील विकासकामांचा संदर्भ देताना त्यांनी प्रधानमंत्री आवास योजना, पायाभूत सुविधा आणि नागरी विकासकामांचा उल्लेख केला. “आधीच्या काळातील आणि सध्याच्या योजनांची तुलना केली, तर बदल स्पष्टपणे दिसतो. महापालिकेत गेल्या काळात अधिक सक्षम कारभार करण्याचा प्रयत्न करण्यात आला,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शहरासमोरील भविष्यातील आव्हानांवर बोलताना त्यांनी वाढती लोकसंख्या, शिक्षणाचा दर्जा आणि रोजगारनिर्मिती यावर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. “या दृष्टीने शाळांचा दर्जा सुधारण्यासह विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला.


