कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कष्टकरी जनता आघाडी तसेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, जय महाराष्ट्र भीमशाहीर परिषद आधी संस्था संघटनांच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
ऑटो, टॅक्सी, सर्व प्रकारचे वाहतूकदार, बांधकाम मजूर, फेरीवाले, फळभाजी विक्रेते, घरकाम कामगार, कष्टकऱ्यांसाठी महाराष्ट्रासह देशभरामध्ये काम करणारे कष्टकऱ्यांच्या नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील कष्टकरी जनता आघाडीने बारणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड, लोणावळा, खोपोली, पनवेलसह मावळ मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार, कष्टकरी असून सर्वांनी बारणे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, असे बाबा कांबळे यांनी म्हटले आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची मागणी करत होतो. महायुतीच्या सरकारने रिक्षा चालकांसाठी, महाराष्ट्रातील तीन कोटी असंघटित कामगार तसेच बांधकाम मजुरांसाठी, घरकाम करणाऱ्या महिलांसाठी देखील कल्याणकारी महामंडळ स्थापन केली आहे. उर्वरीत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, असे कांबळे यांनी पत्रकात म्हटले आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने खासदार बारणे यांना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. देशाच्या हितासाठी व सनातन हिंदू धर्म जपण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी बारणे यांना समस्त ब्राह्मण समाजाने पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याचे पत्र देताना दिलीप कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, महेश बारसावडे, सुषमा वैद्य, आनंद देशमुख, राहुल कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, अतुल इनामदार, संध्या कुलकर्णी, प्रवीण कुरबेट, पंकज कुलकर्णी, अभय कुलकर्णी, श्री खरे, राजन बुडूख, मकरंद कुलकर्णी, वैशाली कुलकर्णी व कार्यकारणी मंडळ उपस्थित होते.
जय महाराष्ट्र भीमशाहीर परिषदेचे समर्थन
खासदार बारणे हे भीमशाहीर परिषदेचे आधारस्तंभ असून शासकीय व निमशासकीय कामांसाठी त्यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते. देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीसाठी संरक्षण खात्याकडून अडीच एकर मिळवून देण्यासाठी बारणे यांनी प्रयत्न केले. त्यामुळे सर्व मतदारांनी बारणे यांना मतदान करून तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवावे, असे आवाहन जय महाराष्ट्र भीमशाहीर परिषदेचे कार्याध्यक्ष विजय बाबा जाधव यांनी केले आहे.
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचा पाठिंबा
अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी 52% समाजाची संघटना आहे. संघाची कर्मचारी आघाडी, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी व शेतकरी आघाडी कार्यरत आहे. संघाच्या पाठिंब्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघातील ओबीसी समाज खासदार बारणे यांच्या पाठीशी राहील, असे पाठिंबा पत्रात म्हटले आहे.


