Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीउद्या पिंपरी चिंचवड शहरात बंदची हाक..!

उद्या पिंपरी चिंचवड शहरात बंदची हाक..!

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून शनिवारी (दि.९) पिंपरी-चिंचवड शहर बंदची हाक देण्यात आली आहे, त्यामध्ये विविध राजकीय पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या या आंदोलनाला राज्यात सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, याबाबत पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते विनायक रणसुभे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कामगार नेते काशिनाथ नखाते, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, एमआयएम पक्षाचे धम्मराज साळवे, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, त्याचप्रमाणे प्रकाश जाधव, सतीश काळे, धनाजी येळकर पाटील, अॅड. लक्ष्मण रानवडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा क्रांती मोर्चाने शनिवारी (दि.९) पुकारलेल्या पिंपरी- चिंचवड शहर बंदमधून आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. शहरातील सर्व उद्योग, शासकीय सेवा, शाळा, महाविद्यालये, शहरातील व्यापारी यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

शनिवारी सकाळी १० वाजता पिंपरीगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सर्व आंदोलक व समाजबांधव पिंपरीगाव येथून पिंपरी येथील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत चालत येतील.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून धरणे व निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचा समारोप सायंकाळी ५ वाजता याच ठिकाणी होईल. या आंदोलनात मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होईल, असे उपस्थित विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments