पिंपरी-चिंचवड शहरात गणपती मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी)पासून मूर्ती बनविण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गणपती मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी)पासून मूर्ती बनविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मूर्ती बनविल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा आयुक्त व प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १२ मे २०२० च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. सर्व कारागीर, मूर्तिकार तसेच उत्पादकांनी केवळ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणार्या मूर्तींची निर्मिती करावी. मूर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी पालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी न केलेल्या कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना मूर्ती विक्री स्टॉलला पालिका परवानगी देणार नाही. विनापरवाना अनधिकृतपणे मूर्ती विक्री करणार्या दुकानदार व व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
मूर्ती तयार करणार्या अथवा विक्री करणार्या कारागीर, मूर्तिकार, उत्पादक यांनी याबाबतची परवानगी घेण्याकरीता पालिकेच्या उद्योगधंदा व परवाना विभागाकडे अर्ज करावा. परवानगीची एक प्रत पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीच्या दुकान किंवा स्टॉलच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. नागरिकांनी केवळ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणार्या पर्यावरणपूरक मूर्ती व सजावटीचे पूजा साहित्य वापरून गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.