गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी केलेलं वक्तव्य चर्चेत
आपल्या सगळ्यांचे गुरु एकच आहेत ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं वक्तव्य आता उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. राज्यात घडलेली राजकीय घडामोड ताजी असतानाच उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे त्यांच्या काही शिलेदारांसह सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. रविवारीच ही घटना घडली आहे. तर आज गुरुपौर्णिमा आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरेंना वंदन करण्यासाठी जे कार्यकर्ते पोहचले आहेत त्यांना उद्देशून हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
काय म्हटलं आहे उद्धव ठाकरेंनी?
“गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपण सगळे मिळून माननीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंसमोर नतमस्तक होत आहोत कारण आपल्या सगळ्यांचे गुरु एक आहेत. मी सुद्धा तुमच्यातलाच आहे, मी देखील तुमच्याप्रमाणेच नतमस्तक होतो आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरेंसमोर. पाया पडायचं ते बाळासाहेब ठाकरेंच्या समोर. आपला जो परिवार आहे तो मजबूत ठेवा. मी तुमचा गुरु नाही. बाळासाहेब ठाकरे हेच आपले गुरु आहेत.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी बंड करत थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील इत्यादी दिग्गज नेत्यांसह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विकासाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. तसंच यापुढच्या सगळ्या निवडणुका शिवसेना (एकनाथ शिंदे), भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित रित्या लढवणार आहे असंही अजित पवारांनी जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी नवी टीम तयार करण्यासाठी मैदानात उतरणं पसंत केलं आहे. तसंच माझे सहकारी चुकीच्या वाटेवर गेले असंही म्हटलं आहे. राज्यात या सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या सगळ्यांचे गुरु हे बाळासाहेब ठाकरेच आहेत असं म्हटलं आहे.