Sunday, May 17, 2026
Homeक्रिडाविश्वबहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय ९ वर्षांपासून बंद; २० कोटी खर्चूनही उद्घाटन लांबणीवर

बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय ९ वर्षांपासून बंद; २० कोटी खर्चूनही उद्घाटन लांबणीवर

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय हे शहरातील प्रमुख आकर्षण असलेले प्राणी संग्रहालय गेल्या तब्बल नऊ वर्षांपासून बंदच आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून सुशोभीकरणासाठी आतापर्यंत सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात आले असले, तरी प्रकल्प पूर्ण होण्याऐवजी विलंबच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या टप्प्यातील सुमारे १४ कोटी रुपयांच्या कामासाठी सुरुवातीला केवळ सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून वेळेत परवानगी न मिळाल्याचे कारण देत संबंधित ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे कामाची गती अत्यंत मंदावली आहे.

सुशोभीकरणाच्या कामासाठी संग्रहालयातील सर्व प्राणी इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. मात्र, काम पूर्ण न झाल्यामुळे नागरिकांना कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शहरात संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामातील सततचा विलंब आणि ठेकेदारांना दिली जाणारी वारंवार मुदतवाढ यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. करदात्यांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून खर्च वसूल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्राणी संग्रहालयाचा कारभार वनविकास महामंडळाकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उन्हाळी सुट्टीच्या काळात विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या अपेक्षेने येथे भेट देतात. मात्र, संग्रहालय बंद असल्यामुळे त्यांना ऐनवेळी माघारी फिरावे लागत आहे.

महानगरपालिका प्रशासनाने या प्रकल्पाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि प्राणी संग्रहालय नेमके कधी सुरू होणार याची ठोस माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही प्रकल्प रखडल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता तरी ठोस निर्णय घेऊन हे प्राणी संग्रहालय लवकरात लवकर नागरिकांसाठी खुले करण्याची गरज व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments