Tuesday, February 18, 2025
Homeताजी बातमीबदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका.....

बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक, चौकशी समितीचा 5 पोलिसांवर ठपका.. !

बदलापूर येथील दोन शाळकरी बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीला त्यावेळी त्याच्याबरोबर असलेले पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात नोंदवला. चकमकीचा मोहोरबंद चौकशी अहवाल न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी उच्च न्यायालयात सादर केला. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या या निष्कर्षाच्या पार्श्वभूमीवर या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल केला जाईल.

या कथित चकमकीची चौकशी ठाणे येथील न्यायदंडाधिकारी अशोक शेंडगे यांनी केली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने न्यायदंडाधिकारी शेंडगे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाची दखल घेतली. तसेच अहवालात नोंदवण्यात आलेल्या निष्कर्षानुसार पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास आणि चौकशी करण्यास बांधील असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचवेळी, कोणत्या तपास यंत्रणेद्वारे प्रकरणाची चौकशी करणार, अशी विचारणा करून त्यावर दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश खंडपीठाने सरकारी वकील हितेन वेणेगावकार यांना दिले आणि त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालाची प्रत महानिबंधक कार्यालयाने सरकारी वकील आणि शिंदे याच्या कुटुंबीयांच्या वकिलांना उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.

शिंदे याच्याशी झालेली चकमक बनावट असल्याचा दावा करून त्याच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कायद्यानुसार या चकमकीची न्यायदंडाधिकाऱ्यांतर्फे चौकशी सुरू असल्याचे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकरणाचा तपास सुरू होता.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी….
भविष्यात अशा परिस्थितीत पोलिसांना घ्यावी लागणारी काळजी आणि खबरदारीबाबतही न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालात सूचना केली आहे. त्यानुसार कोठडीत असलेल्या आरोपीला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्याची वाहनातील डॅश कॅमेऱ्याच्या सहाय्याने चित्रफित तयार केली जावी. ही चित्रफित तयार करण्याची जबाबदारी वाहनाच्या चालकावर ठेवावी. त्यानुसार चित्रिकरण सुरू झाले की नाही याची त्याने खातरजमा करावी. याशिवाय कॅमेरा कार्यान्वित आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी ही आरोपीला अन्यय ठिकाणी घेऊन जाणाऱ्या वरिष्ठ पोलिसावर असेल. वाहनातील डॅश कॅमेरा कार्यान्वित नसल्यास त्याबाबत चालकाने आणि संबंधित अधिकाऱ्याने वरिष्ठांना कळवावे व कॅमेरा दुरूस्त करावा किंवा अन्य वाहनाची सोय करावी, असे न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालात म्हटले आहे.

चौकशी अहवालात काय?
●आरोपीने एका अधिकाऱ्याचे पिस्तूल हिसकावून गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यामुळे अक्षयसह वाहनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करणे योग्य आहे होते का, असा प्रश्न निर्माण झाला.

●चौकशीदरम्यान सादर करण्यात आलेले पुरावे विचारात घेता आरोपीसह वाहनात असलेले चार पोलीस परिस्थिती हाताळण्याच्या स्थितीत होते. शिवाय न्यायवैद्याक प्रयोगशाळेच्या अहवालानुसार आरोपीने हिसकावून घेतलेल्या पिस्तुलावर त्याच्या हाताचे ठसे आढळलेले नाहीत.

●आरोपीने गोळीबार केल्याची कोणतीही चिन्हे त्याला घातलेल्या बेड्या, कपड्यांवर आढळलेली नाहीत. अशा स्थितीत पोलिसांनी बळाचा वापर करणे योग्य नव्हते हे ठळकपणे स्पष्ट होते.

●या चकमकीबाबत संशय निर्माण करणाऱ्या अनेक बाबी असून हे पाच पोलीस आरोपीच्या मृत्यूस जबाबदार आहेत, असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालात नोंदवला.

हे पोलीस जबाबदार…
ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे, हरीश तावडे आणि पोलीस वाहन चालक.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments