१ फेब्रुवारी २०२०
नव्वदच्या दशकात पाकिस्तानी गाण्यांचा प्रभाव भारतीय चित्रपट सृष्टीत होता. मी माझी गाणी पाकिस्तानची आहेत, असे सांगून निर्मात्यांना खपवायचो. कारण, स्वतःची गाणी, चाली आहेत असे सांगीतले तर स्वीकारली जात नाहीत, असा अनुभव आला होता. मी दिग्दर्शक होण्याआधी थोडा लाजाळू, अंतर्मुख असलेली व्यक्ती होतो. गीतकार म्हणून प्रतिष्ठा नव्हती. गीतकारांना आधीही प्रतिष्ठा नव्हती. त्यांना मुन्शी म्हटले जायचे. तरी मित्रांकडून, पुस्तकातून शिकत गेलो. जावेद अख्तर यांनी मला प्रोत्साहन दिले. एक काळ असा होता की आर्ट सिनेमा लांच्छन मानले जायचे. इतकी कलेची वाईट परिस्थिती होती. आता व्यावसायिक, कलात्मक चित्रपटाची सीमारेषा अंधुक झाली आहे. नव्वदच्या दशकात चित्रपटगृहांची परिस्थिती वाईट झाली होती.
दर्शक व्हिडिओ वर चित्रपट पाहु लागले. मग, मल्टीप्लेक्स झाल्यावर कुटुंबच्या कुटुंबे चित्रपट पाहायला येऊ लागले. त्यातून सिनेमात गुंतवणूक देखील आली. आम्ही नवे युवा दिग्दर्शक, विविध शहरा, गावातून आलो. स्वित्झर्लड मध्येच हिंदी सिनेमाची सर्व कथा घडत नाही, हे प्रेक्षकांना कळू लागले. जी भारतातील गावे, शहरे पाहिली नव्हती, ती पाहण्यात रस निर्माण झाला. अशांत वातावरणात सर्जनशीलता वेगळे रंग धारण करते, म्हणून चांगल्या सर्जनशीलतेसाठी शांततेचा माहोल परत यावा, अशी अपेक्षा प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी व्यक्त केली. ’दकनी अदब फाऊंडेशन’ आयोजित ’डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’ मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. विशाल भारद्वाज यांच्याशी सलीम आरिफ यांनी भारद्वाज यांच्याशी संवाद साधला.
विशाल भारद्वाज पुढे म्हणाले की, हैदरसारखा सिनेमा करताना आम्ही मानधन न घेता खर्च कमी केला. आमिर खानने एका वेळी एकच सिनेमा करायचा ट्रेण्ड आणून व्यावसायिकता आणली. गांभीर्य आणले. बॉलीवुडमध्ये कार्पोरेट जगाचा पैसा आला आहे. कार्पोरेटचा हेतू फक्त पैसा मिळवणे हा आहे. पण, त्यामुळे ब्लॅक मनी, अंडर वर्ल्ड बाजूला गेला. घाण बाजूला गेली. गाणी, संवाद यातील बिघडलेल्या शब्दांना कवी, संवाद लेखक जबाबदार आहेत. कलाकारांचे त्याबाबतचे उत्तरदायित्व कमी झाले आहे. शब्द, साहित्य समजायला सगळे कलाकार रंगभूमीची पार्श्वभूमी घेऊन आलेले असतील असे नाही.
डिजीटल प्लॅटफॉर्ममुळे थिएटरला सिनेमा पाहण्यावर परिणाम झाला आहे. थिएटरला प्रेक्षक खेचूून आणणे याचे दिग्दर्शकाला प्रेशर असते. दुसरीकडे आता वेबसिरीज, छोटया फिल्म तयार होण्याचे प्रमाण वाढल्याने तंत्रज्ञ, कलाकारांना भरपूर काम उपलब्ध झाले आहे.पुरस्कार वापसीबद्दल प्रेक्षकातून आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भारद्वाज म्हणाले, पुरस्कार परत देताना सरकारचा नव्हे, तर निवड समितीच्या ज्युरींचा अपमान होतो, हे लक्षात घेतले पाहिजे. ’हैदर’ सारखा सिनेमा आताच्या आंदोलन, गोळीबाराच्या जमान्यात शक्य नाही. शांततेचा माहोल पुन्हा येण्याची गरज आहे. कारण, अशांत वातावरणात सर्जनशीलता वेगळे रंग धारण करते.