पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक औषधउपचार पद्धतीचा लाभ अधिकाधिक रुग्णांना मिळवून देण्याच्या उद्देशाने संरक्षण मंत्रालयाने 1 मे 2022 पासून देशभरातील 37 छावणी रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार केंद्रे कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.
संरक्षण सचिव डॉ.अजय कुमार आणि केंद्रीय आयुष मंत्रालय सचिव वैद्य राकेश कोटेचा यांच्यामध्ये नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे संरक्षण दलांतील कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय तसेच छावणी परिसरातील निवासी यांच्यासह छावणी रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा लाभ घेणाऱ्या इतर सामान्य नागरिकांना आयुर्वेदातील प्रस्थापित आणि काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या उपचार पद्धती उपलब्ध होणार आहेत.
या उपक्रमाला आयुष मंत्रालय पाठबळ पुरविणार असून या 37 रुग्णालयांसाठी कुशल आयुष डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट यांची नेमणूक केली जाणार आहे. या 37 आयुर्वेदिक उपचार केद्रांमध्ये प्रत्यक्ष काम सुरु करण्यासाठी संरक्षण मालमत्ता महासंचालनालय, संरक्षण मंत्रालय आणि केंद्रीय आयुष मंत्रालय एकमेकांच्या सहकार्याने समन्वय साधून आवश्यक कार्य करतील असा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.
या निर्णयाचा लाभ महाराष्ट्राला देखील होणार असून राज्यातील खडकी तसेच देहूरोड या दोन छावणी रुग्णालयांमध्ये सुरु होणाऱ्या आयुर्वेदिक उपचार केंद्रांचा या 37 केंद्रांमध्ये समावेश आहे.