निगडी येथे राष्ट्रीय क्रीडा आयुर्वेद परिषदेचे आयोजन
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडूंचे प्रमाण आणि नैपुण्य वाढवण्यासाठी आयुर्वेदाचा उपयोग करून घेता येईल असा विश्वास निगडी ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व क्रीडाकुलचे संस्थापक संचालक आणि “क्रीडा आयुर्वेद राष्ट्रीय परिषदे”चे समन्वयक मनोज देवळेकर यांनी व्यक्त केला.
निगडी ज्ञानप्रबोधिनी विद्यालय येथे शनिवारी आणि रविवारी ( दि.१८ व १९ फेब्रुवारी) दोन दिवसीय राष्ट्रीय क्रीडा आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याविषयी माहिती देण्यासाठी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देवळेकर बोलत होते. यावेळी महाराष्ट्र मंडळाचे चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे डॉ. महेश देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य उदय जोशी, वैद्य दीप्ती धर्माधिकारी, गुरुकुल प्रमुख आदित्य शिंदे, क्रीडा प्रशिक्षक भगवान सोनवणे आदी उपस्थित होते.
क्रीडा स्कूलच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या मान्यतेने आयुर्वेद व्यासपीठ आणि महाराष्ट्रीय मंडळ यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्घाटन शनिवारी सकाळी ९ वा. होणार आहे, तर समारोप रविवारी सायंकाळी ६ वा. होणार आहे.या परीक्षेचे उद्घाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, क्रीडा संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाष देशपांडे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, जामनगर विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु डॉ. श्रीराम सावरीकर आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच समारोपप्रसंगी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत, महाराष्ट्रीय मंडळाचे सचिव रोहन दामले आदी उपस्थित राहणार आहेत.
या राष्ट्रीय परिषदेत वैद्य विनय वेलणकर, वैद्य टिळक धोपेश्वरकर, आहार तज्ञ वैद्य उर्मिला पिटकर यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच केरळमधील डॉ. राजेश एस. , फ्रान्सची अल्ट्रा ऍथलेट विजेती मरियम गुलियट, क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य डॉ. उत्क्रांत कुर्लेकर, कौस्तुभ रेडकर, शर्वरी इनामदार प्रकाश ठोंबरे आदी उपस्थित आहेत. या परिषदेत सादर होणारे शोध निबंध आणि परिषदेचा अहवाल केंद्रीय आयुष मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे अशीही माहिती परिषदेचे समन्वयक डॉ. महेश देशपांडे व वैद्य ज्योती मुदर्गी यांनी दिली.