Friday, September 29, 2023
Homeताजी बातमीअखंड ‘स्वर सुमनांजली’ सादर करीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना मानवंदना

अखंड ‘स्वर सुमनांजली’ सादर करीत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांना मानवंदना

चिंचवड मध्ये दिग्गज आणि उदयोन्मुख कलाकारांचे बहारदार सादरीकरणभारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीमिनित्त ‘स्वर सुमनांजली’ हा अनोखा कार्यक्रमअखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा व कलाश्री संगीत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात संपन्न झाला. ‘अखंड २४ तास स्वरयज्ञ’ कार्यक्रमाला शनिवारी (९ एप्रिल) सकाळी सहा वाजता सुरुवात झाली. यामध्ये अनेक दिग्गज, उदयोन्मुख कलाकारांनी आपली कला सादर करीत पं. भीमसेन जोशी यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, कलाश्री संगीत मंडळाचे पं. सुधाकर चव्हाण, सच्चिदानंद कुलकर्णी, पं.अतुलकुमार उपाध्ये, समीर महाजन, नंदकिशोर ढोरे, सुषमा समर्थ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राची सुरुवात पं. सुधाकर चव्हाण यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग अहिर भैरव सादर करीत बडाख्याल व विलंबित एकतालात ‘हो कर तार गायले’ तसेच छोटाख्याल व तीनतालात ‘अलबेला सजन आयोरे’ हे गीत सादर केले. त्यांना नंदकिशोर ढोरे (तबला), प्रभाकर पांडव (संवादिनी), अभयसिंग वाघचौरे (गायनसाथ), संदीप गुरव (तानपुरा), नामदेव शिंदे (तानपुरा), आकाश मोरे (टाळ), गंभीर महाजन (पखवाज) यांनी साथसंगत केली.
त्यानंतर सुधीर दाभाडकर यांनी राग अल्हैया बिलावल सादर केला. छोटा ख्याल व मध्य लय त्रितालात ‘सुमिरन भज राम नामको’ हे गीत सादर केले. तसेच ‘टाळ बोले चिपळीला’ हे भजन त्यांनी गायले. त्यांना दशरथ राठोड (तबला), अभयसिंग वाघचौरे (संवादिनी), गंभीर महाजन (पखवाज), चंद्रकांत वाघचौरे (टाळ) यांनी साथ केली. त्यानंतर यश त्रिशरण यांचे तबला वादन झाले. त्यांनी ताल तीनतालात तबला वादन केले. त्यांना यश खडके (संवादिनी) यांनी साथ दिली.

त्यानंतर रईस अली खाँ यांचे सितारवादन आणि दीपक भानसे यांचे बासरीवादन झाले. या दोघांनीही राग परमेश्वरी सादर केला. त्यांना डॉ. अतुल कांबळे (तबला) यांनी साथ केली. पं. उदय भवाळकर यांनी जौनपुरी रागात ताल सूर ताल धमार हे गीत गायले. त्यांना उमेश पुरोहित, प्रताप आव्हाड (पखवाज), चिंतामणी नातू (तंबोरा) यांनी साथ दिली.गायत्री जोशी राग साल गवराली सादर केला. त्यांनी ‘तुसी ना बोले मे ना बोलू शाम’, ‘मोरे पगना चलत’ हे गीत गायले. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), उमेश पुरोहित (संवादिनी) यांनी साथ दिली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचा समारोप समीर सूर्यवंशी यांच्या एकल तबलावादनाने झाला. त्यांना यश खडके (संवादिनी) यांनी साथ दिली.

दुसऱ्या सत्राची सुरुवात रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग तोडीमध्ये बडाख्याल विलंबित ताल सादर करीत ‘मेरे मन आओरे’, ‘बेगुण गुण गाई’ हे गीत सादर केले. त्यांना भरत कमोद (तबला), चैतन्य कोंढे (संवादिनी) यांनी साथ दिली. त्यानंतर निनाद दैठणकर यांचे संतुरवादन झाले. त्यानी राग चारूकेशी सादर केला. त्यांना अक्षय कुलकर्णी यांनी तबलासाथ केली. अपर्णा गुरव यांनी राग बसंतमध्ये ‘ऐसी लगन लगाई’ गीत गायले तसेच छोटाख्यालमध्ये’ ए जान दे दे मितवा’ सादर केले. त्यांना प्रणव गुरव (तबला), माधव लिमये (संवादिनी) यांनी साथ दिली. त्यानंतर उस्ताद अर्षद अली यांचे गायन झाले. त्यांनी राग मुलतानीमध्ये बडाख्याल विलंबित एक ताल, छोटा ख्यालमध्ये ‘रे साँवरिया’, ‘नैन मै आन बनी’ सादर केले. त्यांना शाश्वती चव्हाण (तंबोरा), अंकिता (तंबोरा), अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडालकर (संवादिनी) यांनी साथ दिली. पं. रामदास पळसुळे यांचे तबलावादन झाले. त्यांना प्रथमेश (तबला) गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी साथ दिली. पं. शौनक अभिषेकी यांनी राग गावती सादर केला. बडाख्यालमध्ये आस लागी हे गीत त्यांनी गायले. त्यांना उदय कुलकर्णी (संवादिनी), विभव खांडोळकर (तबला) यांनी साथ दिली. रविवारी (१० एप्रिल) सकाळी सहा वाजता कार्यक्रमाचा समारोप होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments