मनसेच्या नेत्यांनी आज औरंगाबादेत शिवसेनेच्या नेत्यांची गाडी अडवून एकच गोंधळ घातला. औरंगाबादच्या नामांतरावरून आज मनसेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवली. त्यांना जाब विचारला आणि त्यांच्या अंगावर पत्रकं फेकून जोरदार घोषणाबाजीही केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मनसेने राडा केला आहे. त्यामुळे औरंगाबादेत मनसेचं बळ वाढत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
वाचाः मनसे हा पक्ष आहे की टोळी हेच कळत नाही; आदित्य ठाकरेंची टीका
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर असं करण्याचा अल्टिमेटम मनसेने शिवसेनेला दिला होता. हा अल्टिमेटम संपला तरी राज्य सरकारने काहीच निर्णय न घेतल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मनसेने क्रांती चौकात चंद्रकांत खैरे यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या निषेधाची पत्रके खैरेंच्या अंगावर फेकली. तसेच शिवसेना मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. मनसे शिवसेना यांच्यातील वाद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहे.