बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी लाच मागणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर ७० हजार रुपयांची रक्कम स्वीकारणारा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्का देऊन पसार झाला.पिंपरी चिंचवड शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
तक्रार अर्जावरुन बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील सांगवी पोलीस स्थानकातील महिला पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
पोलिस उपनिरीक्षक हेमा सोळुंके (वय २८) यांना ताब्यात घेतले असून, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक देसाई पळून गेले आहेत. या प्रकरणी ४२ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक हेमा सोळुंके आणि सहायक उपनिरीक्षक बाळकृष्ण देसाई दोघेही सांगवी पोलिस ठाण्यात नियुक्त आहेत. तक्रारदार पुरुषाविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात अर्ज दाखल आहे. त्या अर्जाची चौकशी उपनिरीक्षक सोळुंके करीत होत्या. अर्जावरून बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ व २६ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. उपनिरीक्षक हेमा सोळुंके यांच्या सांगण्यावरून सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडे एक लाख रुपयांची मागणी केली व तडजोडीअंती ७० हजारांची लाच मागितली. त्यानुसार गुरुवारी (२ डिसेंबर) सहायक उपनिरीक्षक देसाई यांनी तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांची लाच स्वीकारली.
२५ आणि २६ नोव्हेंबरला पडताळणी केली असता आरोपी सोळुंके यांच्या सांगण्यावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक देसाई यांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ७० हजार रुपये ठरवले. २ डिसेंबरला आरोपी देसाईंनी लाच स्वीकारली आणि त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा पथक पुढे सरसावलं असता, सहायक पोलिस उपनिरीक्षक अशोक देसाई यांना पकडण्यासाठी गेले. त्या वेळी देसाई यांनी पथकातील अधिकाऱ्यांना धक्का दिला. त्यानंतर लाच घेतलेली रक्कम घेऊन त्यांच्या दुचाकीवरून ते पळून गेले.