शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेदेखील माघार घेण्यास तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश असलेला शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिशीचे उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाऊ शकते.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. या १६ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना ४८ तासांचे अल्टिमेटम दिले आहे. त्यामुळे आता शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या नोटिशीनंतर शिंदे गटातील आमदार न्यायालयात जाण्याची शक्यता असून झिरवळ ते यांच्या नोटिशीला आव्हान देण्याची शक्यता आहे. या नोटिशीबद्दल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे. “आम्हाला नोटीस देण्यात आली हे खरं आहे. काळजी करण्याचे कारण नाही. त्यांना उत्तर दिलं जाईल. निलंबन होणार नाही. कोर्टात जाण्याची वेळ आली तर ते करावे लागेल. आम्ही लांब आहोत, कोणालातरी घरी नोटीस दिली आहे. आम्ही अजूनही कोणत्या पक्षात गेलेलो नाही. पक्ष सोडलेला नाही. आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय. बैठकीला का येऊ शकलो नाही त्याबद्दल उत्तरात सांगू. नोटिशीला उत्तर देऊ. एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत प्रक्रिया सुरु केली आहे. काळजीचे कारण नाही,” असे भरत गोगावले यांनी सांगितले.
दरम्यान, शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता. तसे सूतोवाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. आजच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच दुसरीकडे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बजावलेल्या नोटिशीनंतर एकनाथ शिंदे तसेच त्यांचे बंडखोर आमदार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.