एशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे. एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर सहज मिळवला आणि एशिया कपवर तब्बल आठव्यांदा नाव कोरलं.
मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) त्यांच्याच घरात धुव्वा उडवला आणि एशिया कपचं जेतेपद पटकावलं, एशिया कपच्या इतिहासात टीम इंडियाने (Team India) तब्बल आठव्यांदा एशिया कपवर आपलं नाव कोरलं आहे. एशिया कप 2023 चा अंतिम सामना रविवारी कोलंबोतल्या प्रेमदासा स्टेडिअमवर (Premdasa Stadium) खेळवण्यात आला. श्रीलंकेने टॉस जिंकला आणि पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय त्यांनाच महागात पडला. लंकेचा संपूर्ण संघ 15.2 षटकात 50 धावांवर ऑलऊट झाला.

सिराज नावाचं वादळ

पावसामुळे भारत-श्रीलंका अंतिम सामना अर्धा तास उशीराने सुरु झाला. पण त्यानंतर मैदानावर सिराज नावाचं वादळ झालं आणि लंकेचा संघ पालापाचोळ्यासारखा उडून गेला. सिराजने अवघ्या सात धावांमध्ये सहा विकेट घेतल्या. यात एकाच ओव्हरमध्ये त्याने चार विकेट घेण्याचा विक्रम केला. एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. याशिवाय हार्दिक पांड्याने 3 तर जसप्रीत बुमराहाने एक विकेट घेत लंकेचं कंबरडं मोडलं. विजयाचं हे माफक आव्हान टीम इंडियाने एकही विकेट न गमावता पार केलं. शुभमन गिल आणि ईशान किशनने सहाव्या षटकातच टीम इंडियाला विजय मिळवून दिला.