पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’ प्रदान; पिंपरी-चिंचवडमध्ये सांगीतिक कार्यक्रमाचे श्रेयाने दिले आश्वासन
“संघर्ष आणि साधना म्हणजे आशाताई भोसले. अशा महान व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत मोठा सन्मान आहे,” अशा भावना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी व्यक्त केल्या. ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना यंदाचा २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, पिंपरी-चिंचवड कलारंग प्रतिष्ठान आणि सिद्धिविनायक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. शनिवारी (दि. २९) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भव्य सोहळ्यात पुरस्कार वितरण करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्रेया घोषाल म्हणाल्या, “लतादीदी, आशाताई, हृदयनाथजी आणि उषाताई यांची गाणी ऐकून मी मोठी झाले. संगीतातील ‘सा’ देखील यांच्यामुळेच शिकले. मी स्वतःमध्ये आशाताई आणण्याचा प्रयत्न करते. माझे पहिले मराठी गाणे ‘गणराज रंगी नाचतो’ रेकॉर्ड झाले, तेव्हा मी १३ वर्षांची होते. आशाताईंची गाणी आजही मला प्रेरणा देतात.”
“भाऊसाहेब भोईर यांच्या निमंत्रणाचा मी स्वीकार करते. पिंपरी-चिंचवड शहरासाठी लवकरच एक सांगीतिक कार्यक्रम करेन,” असे आश्वासनही श्रेया घोषाल यांनी दिले. यावेळी उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या घोषणेचे स्वागत केले.
पुरस्कारामध्ये १ लाख ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते, तर पैठणी मानसी भोईर-घुले यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना प्रदान करण्यात आली.
‘श्रेयाला लहानपणापासून पाहतोय’ — पं. हृदयनाथ मंगेशकर
श्रेया घोषाल यांना आशीर्वाद देताना पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, “श्रेयाला मी लहानपणापासून बघतो आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये सर्वप्रथम तिला माझेच गाणे गाताना पाहिले. तेव्हाच तिला ‘तू खूप छान गाते’ असा आशीर्वाद दिला होता.” यावेळी त्यांनी भाऊसाहेब भोईर यांनी आमदार व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली.
‘भाऊसाहेब भोईर हे शहराचे सांस्कृतिक मंत्री’ — अमित गोरखे
आमदार अमित गोरखे म्हणाले, “भाऊसाहेब भोईर हे या शहराचे सांस्कृतिक मंत्री आहेत. भोईर यापूर्वी भाजपमध्ये आले असते तर आज ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री झाले असते. अजूनही वेळ गेलेली नाही.” त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित प्रेक्षकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.
‘लतादीदी श्वास, आशादीदी उच्छ्वास; हृदयनाथजी हृदय’
स्वागत व प्रास्ताविक करताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले, “या सांगीतिक प्रवासाचा श्वास लतादीदी आहेत, उच्छ्वास आशादीदी आहेत आणि याचे हृदय म्हणजे पं. हृदयनाथ मंगेशकर आहेत. देश लता मंगेशकर यांना सन्मानाने ‘दीदी’ म्हणतो; त्याचप्रमाणे आता श्रेया घोषाल या आमच्या ‘छोटी दीदी’ आहेत.” श्रेया घोषाल यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्रमासाठी वेळ द्यावा, असा आग्रह त्यांनी केला. त्याला श्रेया यांनी हात उंचावून होकार दर्शविला.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “आशा भोसले यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे पिंपरी-चिंचवड शहराचा सन्मान आहे.”
‘आशा से श्रेया तक’ने रंगली सुरेल मैफल
पुरस्कार वितरण सोहळ्यात मोरया थिएटर निर्मित ‘आशा से श्रेया तक’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. आशा भोसले आणि श्रेया घोषाल यांच्या गाजलेल्या सदाबहार गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मानसी भोईर-घुले यांनीही आपल्या गायनाने रसिकांची दाद मिळवली. श्रेया घोषाल यांच्या हस्ते मानसी भोईर-घुले यांच्या ‘मानसी रेस्कोर’ बँडचे अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमात ‘आशा भोसले पुरस्कार’च्या गौरवशाली परंपरेची माहिती देणारी चित्रफीतही दाखविण्यात आली. सन २००२ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान केला जात आहे. यापूर्वी गानकोकिळा स्व. लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, पं. शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरिहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, पद्मभूषण उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, डॉ. सलील कुलकर्णी आणि शान (शांतनू मुखर्जी) यांसारख्या दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमास आमदार अमित गोरखे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उद्योजक कृष्ण कुमार गोयल, नगरसेवक गौरव घुले, मानसी भोईर-घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग, गौरी लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.


