Monday, June 15, 2026
Homeताजी बातमीपिंपरी चिंचवड मध्ये तब्बल ५० हजार नव्या मिळकती आढळून आल्या…पालिकेचे उत्पन्न १५०...

पिंपरी चिंचवड मध्ये तब्बल ५० हजार नव्या मिळकती आढळून आल्या…पालिकेचे उत्पन्न १५० कोटींनी वाढण्याचा अंदाज

९ फेब्रुवारी २०२१,
पिंपरी पालिकेने शहरातील छुप्या मिळकतींचा शोध सुरू केल्यानंतर तब्बल ५० हजार मिळकती आढळून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या माध्यमातून पालिकेचे उत्पन्न १५० कोटींनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विविध मोबाइल कंपन्यांचे ६०० टॉवर आतापर्यंत आकारणीशिवाय होते, असे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पिपरी-चिंचवड शहरातील मिळकतींची संख्या सद्याच्या स्थितीत ५ लाख ४० हजार इतकी आहे. शहरातील छुप्या मिळकतींचा शोध घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार, नवीन बांधकामे, वाढीव बांधकामे, वापरात बदल झालेल्या मिळकती आदींचे सर्वेक्षण करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली. त्यानुसार, नोव्हेंबर २०२० पासून सर्वेक्षणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आतापर्यंत ३० हजार मिळकतींचा शोध लागला आहे. उर्वरित सर्वेक्षणात आणखी २० हजार मिळकती नक्कीच आढळून येतील, अशी शक्यता संबंधित संस्थेने व्यक्त केली आहे. त्या आधारे, एकूणात नव्या ५० हजार मिळकतींच्या माध्यमातून पालिकेचे जवळपास १५० कोटी रुपये उत्पन्न वाढू शकेल, असा विश्वास पालिकेच्या करसंकलन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.

नव्याने आढळून आलेल्या मिळकतींमध्ये मोबाइल कंपन्यांचे ६०० टॉवर आढळून आले आहेत. त्यांची कागदपत्रे तपासणे व मोबाइल अ‍ॅपमध्ये माहिती गोळा करून करआकारणीविषयक सविस्तर माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी, सुमारे ५०० टॉवरची नोंद महापालिकडे झालेली आहे. याव्यतिरिक्त तब्बल ६०० मोबाइल टॉवर आकारणीशिवाय कसे राहिले, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतो आहे. दरम्यान, मिळकतींच्या सर्वेक्षणाचे काम ९० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित होते. करोना संकटामुळे ते होऊ शकले नाही. त्यामुळे संबंधित संस्थेला तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने नुकताच घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments