Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीमहिलेचा विनयभंग करून डोळे केले निकामी करणारया विकृताला अटक

महिलेचा विनयभंग करून डोळे केले निकामी करणारया विकृताला अटक

१० नोव्हेंबर २०२०,
शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे ३७ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिचे दोन्ही डोळे निकामी करणाऱ्या हल्लेखोरास पोलिसांनी अटक केली आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

कुंडलिक साहेबराव बगाडे (वय ५०, रा. उंटवडी, ता. बारामती) असे आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पथकास अधीक्षकांनी ३५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. पत्रकार परिषदेत देशमुख यांनी सांगितले, की तीन नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास न्हावरे येथे राहणारी पीडित महिला बाथरूमला गेली असता आरोपीने छेडछाड काढून तिला मारहाण केली. यामध्ये तिच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी न्हावरे परिसरात एका चायनीज सेंटरमध्ये वेटरचे काम करीत होता. गुन्हा घडल्यानंतर पोलिस तपास करीत असल्याचे माहीत झाल्यानंतर त्याने दाढी व डोक्याचे केस काढले आणि तो तेथून फरार झाला. या माहितीनुसार आणि पीडितेने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्या दिशेने तपास केला आणि परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेतला. ‘त्याचा स्वभाव रागीट असून, तो नेहमी दारूच्या नशेत असतो. मफलर वापरतो. नेहमी कोणत्याही कारणावरून वाद घालतो. मुका असल्याचे ढोंग करून भीक मागतो,’ अशी माहिती तपास पथकाला मिळाली होती.

सोमवारी (९ नोव्हेंबर) पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या पथकाने शिक्रापूर येथील चाकण चौकातून आरोपीला ताब्यात घेतले. हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपीने त्याचा पेहराव बदलला होता. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments