८ नोव्हेंबर २०२०,
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांची रवानगी सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं . अलिबाग येथील कारागृह त्यांच्यासाठी सुरक्षित नसल्याने त्यांना तळोजा कारागृहात हलवण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली होती . परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन कार्यवाही करावी असे निर्देश न्यायालयाने दिले होते . त्यानुसार कारागृह महानिरीक्षकांची (आय जी ) परवानगी घेऊन अर्णब यांच्यासह तिन्ही आरोपीना आज सकाळी तळोजा कारागृहात आणलं गेल्याची माहिती अलिबाग कारागृह अधीक्षक ए . टी. पाटील यांनी दिली.
दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली. आता त्यांच्या जामिनावर उद्या निर्णय होणार आहे. जर उद्याही त्यांना जामीन मिळाला नाही तर अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची चिन्हं आहेत.