५ नोव्हेंबर २०२०,
अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई हायकोर्टाकडून तातडीचा दिलासा मिळू शकला नाही. आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब यांना आजची रात्रही न्यायालयीन कोठडीतच काढावी लागणार आहे.

अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली असता तात्काळ सुटकेचा दिलासा अर्णब यांना मिळू शकला नाही.
‘अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केलाय. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’, असा युक्तिवाद गोस्वामींसाठी त्यांच्या वकिलांनी मांडला. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयानं जामिनावरील सुटकेविषयी उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवली.