५ नोव्हेंबर २०२०,
“अर्णव हा भाजपचा प्रवक्ता आहे. म्हणून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांच्या पक्षाचा तो राष्ट्रीय कार्यक्रम असेल”, अशी टीका शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे, त्यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता, ते आज माध्यमांशी बोलत होते.
अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीचं म्हणणं ऐकून भाजपच्या हृदयाला पाझर फुटला नसेल तर त्यांनी मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये, असा टोलाही शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लगावला आहे.
आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, पण त्यांना नाईक कुटुंबीयांच्या घरी जाऊन समजून घेतलं असतं तर ज्याला मन आहे, त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा काम केलं नसतं. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. रिया चक्रवर्ती प्रकरणात वेगळी भूमिका असते आणि अन्वय नाईक आणि त्यांची आई आत्महत्या प्रकरणात वेगळी?, असा घणाघातही संजय राऊतांनी मोदी सरकारवर केला आहे.
महाराष्ट्राचे पोलीस म्हणजे कळसूत्री बाहुल्या नाहीत. त्यांनी कारवाई केली याचा राजकारणाशी संबंध नाही. अर्णव गोस्वामी हे भाजप कार्यकर्ते आहेत. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे, कार्यकर्त्यांनी कोणत्या प्रकारचा गुन्हा केलाय हे समजायला हवं. त्याच्यावर केलेली कारवाई ही पत्रकार म्हणून नाही. त्याने कोणाला तरी हक्काचे पैसे दिले नाहीत त्यामुळे ते कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यातून त्यांनी आत्महत्या केली आणि कोणामुळे आत्महत्या केली ते लिहून ठेवलं, जे सुशांत सिंग प्रकरणात नव्हतं, हेसुद्धा संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.
सुशांत प्रकरणात वेगळी आणि या प्रकरणात वेगळी अशी केंद्रातील आणि राज्याच्या भाजपची भूमिका आहे. पडद्यामागून दिल्लीतून काय काय हालचाली सुरू आहेत हे जर मी सांगितलं तर सगळ्यांची पळताभुई थोडी होईल. देशाच्या गृहमंत्र्यांनी आणि भाजपच्या नेत्यांनी अन्वय नाईक प्रकरणात कुटुंबाची भेट घेतली पाहिजे, त्यांचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे, त्याचे अश्रू आणि वेदना त्यांना समजल्या पाहिजेत, असंही म्हणत त्यांनी अमित शाहांवरही निशाणा साधला आहे.
विरोधक जो हंगामा करत आहेत, त्यामुळे त्यांचे वस्त्रहरण होत आहे. मेट्रो कारशेडचं काम सुरू आहे, तो विषय आता संपलाय. विरोधकांना काहीही बोलू द्या, मुख्यमंत्र्यांचा विषय इथे कुठून आला. ही पोलिसांची कारवाई असल्याचंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.