ऑक्टोबरपर्यंत विकासकामांना गती; सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारेच राहणार तिकीट दर
पिंपरी-चिंचवड (दि. २७ जून) : शहरातील सर्वसामान्यांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या अप्पू घराचा लवकरच कायापालट करण्यात येणार असून, आधुनिक राईड्स, अत्याधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून ते अधिक आकर्षक बनविण्यात येणार आहे. या कामांमध्ये दर्जा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार असून, पर्यटकांना दर्जेदार अनुभव देण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याची माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.
बारणे म्हणाले, “अप्पू घर हे पिंपरी-चिंचवडकरांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. खासगी अम्युझमेंट पार्कच्या तुलनेत येथे तिकीट दर अत्यंत कमी असल्याने सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांत या ठिकाणी अपेक्षित बदल झाले नव्हते. त्यामुळे आता काळाची गरज ओळखून येथील राईड्स, पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या सुखसोयींचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
सर्वसामान्यांचा विचार कायम
अप्पू घराचे आधुनिकीकरण करताना तिकीट दर वाढवून सर्वसामान्यांवर आर्थिक भार पडणार नाही, याची विशेष काळजी घेतली जाईल, असे बारणे यांनी स्पष्ट केले. “कामगारांच्या शहरातील प्रत्येक कुटुंबाला परवडणाऱ्या दरात दर्जेदार मनोरंजनाचा आनंद घेता यावा, ही महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे सुविधा आधुनिक झाल्या तरी तिकीट दर सर्वसामान्यांच्या आवाक्यातच ठेवले जातील,” असे त्यांनी सांगितले.
२०३१ पर्यंत करार; वॉटर पार्कसह नवे आकर्षण
अप्पू घरासाठी संबंधित कंत्राटदारासोबत २०३१ पर्यंतचा करार करण्यात आला आहे. या प्रकल्पात वॉटर पार्कसह विविध नाविन्यपूर्ण मनोरंजन सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना बारणे म्हणाले की, उपलब्ध निधीतून ऑक्टोबरपर्यंतची विकासकामे वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक कामाचा दर्जा उत्कृष्ट राहावा आणि पर्यटकांना सुरक्षित व दर्जेदार अनुभव मिळावा, यासाठी प्रशासनाकडून नियमित देखरेख केली जात आहे.
पुन्हा मिळणार शहराच्या पर्यटनाचा मान
आधुनिक सुविधा, आकर्षक राईड्स आणि दर्जेदार मनोरंजनाच्या माध्यमातून अप्पू घराला पुन्हा एकदा पिंपरी-चिंचवड शहराचे प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा संकल्प असल्याचे अभिषेक बारणे यांनी सांगितले. आगामी काळात अप्पू घर अधिक आधुनिक, सुरक्षित आणि कुटुंबांसाठी आनंददायी पर्यटनस्थळ म्हणून नव्या रूपात नागरिकांसमोर उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


