Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वनिगडीतील ‘अप्पु घर’चा होणार कायापालट; १८.६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

निगडीतील ‘अप्पु घर’चा होणार कायापालट; १८.६० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

​पिंपरी-चिंचवड: गेली ३५ वर्षे पिंपरी-चिंचवडकरांच्या बालगोपाळांच्या आणि शहरवासीयांच्या आठवणींचा कणा राहिलेले आणि शहराच्या पर्यटन ओळखीचे केंद्र असलेले निगडी येथील इंदिरा गांधी उद्यानातील ‘अप्पु घर’ (Appu Ghar) अम्युझमेंट पार्क आता नव्या आणि अत्याधुनिक रूपात पाहायला मिळणार आहे. तब्बल १८ कोटी ६० लाखांच्या खासगी गुंतवणुकीतून या पार्कचे संपूर्ण कायापालट करण्यात येणार असून, यासंदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी उपसुचनेसह मंजूर केला आहे.

३५ वर्षांचा वारसा आणि आधुनिकीकरणाची गरज

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात जुने मनोरंजनालय म्हणून अप्पु घर ओळखले जाते. मात्र, काळाच्या ओघात येथील बहुतांश राईड्स २० ते ३५ वर्षे जुन्या झाल्या आहेत. जुन्या आणि जीर्ण झालेली यंत्रसामग्री व राईड्समुळे आजची नवी पिढी याकडे आकर्षित होत नसल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाली आहे, ज्याचा थेट परिणाम महसुलावर होत होता. बाजारात येत असलेल्या नव्या पर्यटन स्थळांशी स्पर्धा करणे कठीण झाल्यामुळे अप्पु घराचे संपूर्ण आधुनिकीकरण करणे काळाची गरज बनले होते.

कोरोना काळातील अडचणी अन् दोन वर्षांची मुदतवाढ

कोरोना प्रादुर्भावाच्या कठीण काळात १६ मार्च २०२० ते जानेवारी २०२२ या कालावधीत अप्पुघर बंद ठेवावे लागले होते. या कालावधीत चालकाला झालेले व्यावसायिक नुकसान व अटी-शर्तीनुसार भाडेदरात वाढ करून, करार संपण्याच्या कालावधीनंतर अतिरिक्त २ वर्षे मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. हाच अत्यंत महत्त्वाचा विषय स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी योग्य त्या उपसुचनांसह मंजूर केला आहे.

काय असणार आहे नवीन प्रकल्पात?

मे. पुष्पक अम्युझमेंटच्या माध्यमातून या प्रकल्पात तब्बल १८ कोटी ६० लाखांची खासगी गुंतवणूक केली जाणार आहे.

आधुनिक राईड्स आणि आकर्षणे:

पार्कमध्ये लॉग् फ्ल्युम (पाण्यावरील घसरगुंडी), फ्लॉइंग सिनेमा, ३६०° इमर्सिव्ह डोम, हॉरर हाऊस, मिरर मेझ व इन्फिनिटी टनल, नायगारा कृत्रिम धबधबा, किड्स ट्रॅफिक पार्क, आर्केड गेम्स, एआर-व्हीआर झोन आणि इंटरॅक्टिव्ह सेल्फी झोन यांसारख्या अत्याधुनिक व थरारक राईड्सची भर पडणार आहे.

सर्वसमावेशक सुविधा:

पार्कचे ‘नेचर थीम’ व ‘किड्स थीम’वर आधारित सुशोभीकरण केले जाणार असून, डिजिटल तिकीट प्रणाली, क्यू मॅनेजमेंट, स्मार्ट पार्किंग, आधुनिक फूड कोर्ट, पिण्याच्या पाण्याची व ड्रेनेजची उत्तम व्यवस्था केली जाणार आहे.

सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य:

नागरिकांच्या सुरक्षेसाठी फायर सेफ्टी, सीसीटीव्ही मॉनिटरिंग, आपत्कालीन यंत्रणा, स्ट्रक्चरल सेफ्टी, अतिथी विमा (Guest Insurance) आणि सार्वजनिक दायित्व विम्यासह सर्व मानकांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे.

हा संपूर्ण प्रकल्प पुढील १२ ते १८ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या करारानुसार पहिल्या वर्षी १०% आणि त्यानंतर दरवर्षी ५% वार्षिक भाडेवाढ महापालिकेला मिळणार आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यटन क्षेत्रामध्ये मोठी भर पडणार असून, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन व्यवसायांना चालना मिळणार आहे. – अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments