गुरुवारी पिंपरी चिंचवड मुख्य प्रशासकीय भवन येथे झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत 72 कोटी 66 लाख रुपयांच्या विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत एकूण विषय पत्रिकेवरील एकूण 33 विषय आणि ऐनवेळचे पाच विषय अशा एकूण 38 विषयांना मंजूरी देण्यात आली. तर दोन विषय तहकूब ठेवण्यात आले अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली.
प्रभाग क्र. 7 मधील कबड्डी प्रशिक्षण केंद्रातील विद्युत विषयक कामांसाठी 1 कोटी 45 लाख रुपये, भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईन प्रमाणे विकसित करण्यासाठी 2 कोटी 26 लाख रुपये तसेच पिंपरीतील नवमहाराष्ट्र, पवनेश्वर आणि इतर मैदानावरील दिव्यांचे नुतनीकरण करण्यासाठी 91 लाख रुपये खर्च होणार आहेत.
मंजूर झालेल्या विषयांमध्ये ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व्यवस्था, निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नुतनीकरण अशा विविध विकास कामांच्या सुमारे 72 कोटी 66 लाख रुपये खर्चास मंजूरी देण्यात आली. तसेच पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी आवश्यक उपकरण खरेदीसाठी 43 लाख रुपये, मैला शुध्दीकरण पंपींग स्टेशन मधील स्काडा प्रणालीचे चालन देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी 94 लाख रुपये मंजूर करण्यात आली. तसेच प्रभाग क्र. 23 मधील स्मशानभूमी आणि घाटाच्या नुतनीकरणासाठी 83 लाख रुपये खर्च होणार आहेत. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय बहुउद्देशीय इमारतीमध्ये फर्निचर आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 3 कोटी 83 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे नुतनीकरणासाठी 64 लाख रुपये, प्रभाग क्र. 22 मधील ज्योतिबानगर येथील बाजीप्रभू चौक ते तापकीर मळा रस्त्यावरील विद्युत विषयक कामांसाठी 82 लाख रुपये मंजूर करण्यात आली. या बैठकीत एकूण 72,66,51,658 रुपयांच्या विकास कामांना स्थायी समिती बैठकीत मंजूरी देण्यात आली. अशीही माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.