Tuesday, July 8, 2025
Homeताजी बातमीमहापालिका सभेत पदोन्नतीच्या विषयास मान्यता

महापालिका सभेत पदोन्नतीच्या विषयास मान्यता

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे अभिनामाचे पद नव्याने निर्माण करणे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर आनंद गायकवाड, पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर सोहन निकम, विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावर महेश कावळे, संतोष दुर्गे, समीर दळवी तसेच जेष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. वर्षा घोगरे आणि डॉ. शंकर मोसलगी, निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर लक्ष्मीकांत अत्रे आणि सहाय्यक आयुक्त या पदावर नाना मोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी हे अभिनामाचे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात आपत्ती संबंधीत घटकांचे नियोजन करण्यासाठी तसेच शहरातील आपत्ती विषयक बाबी हाताळण्यासाठी पूर्णवेळ आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाची आवश्यकता होती. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर या पदाची निर्मिती करण्याचे प्रस्थावित होते. या विषयाला प्रशासक शेखर सिंह यांनी विशेष बैठकीत मान्यता दिली.

आपत्ती व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात समन्वयाची व मनुष्यबळाची आवश्यकता असते. आपत्ती काळात आणि युध्द पातळीवर काम करताना उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर, गोंधळ कमी व्हावा व सर्व स्तरावर सर्व घटकांमध्ये समन्वय राहावा यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या अभिनामाचे पद महापालिकेच्या आस्थापनेवर निर्माण करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित आहे. पावसाळ्यात होणारी अतिवृष्टी, पूर परिस्थितीचा पूर्वानुभव, वादळे, संसर्गजन्य रोग, कारखान्यातील अपघात, रस्ते अपघात, इमारतींना आग लागणे, घरांना आग लागणे यासारख्या आपत्तीत जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणात होते. तसेच संसर्गजन्य रोगांचा नागरिकांच्या जीवास मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो, यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे व आपत्ती परिस्थिती निर्माण झाल्यास प्रतिसाद देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे, बचाव पथक निर्माण करणे आवश्यक साधनसामग्री व माहिती संकलित करून अद्यावत ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्व क्षमतेने व पूर्ण वेळ कार्यान्वित करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवर आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या अभिनामाचे पद नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

        पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे रिक्त पद पदोन्नतीने भरण्यासाठी लेखाधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव , कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, आणि शिस्तभंग विषयक कारवाई आदी सेवाविषयक तपशील पडताळून आणि शासन मान्यतेच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदावर आनंद गायकवाड यांची पदोन्नतीने सर्वानुमते शिफारस करण्यात आली होती. त्यानुषंगाने आज झालेल्या महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी नियुक्ती करण्याच्या विषयास मान्यता दिली.

        महापालिकेच्या पर्यावरण विभागासाठी कार्यकारी अभियंता हे अभिनामाचे पद रिक्त असून हे पद पदोन्नतीने भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी गोपनीय अहवाल, शिस्तभंग आणि मत्ता व दायित्वाची माहिती, संगणक अर्हता आदी सेवाविषयक बाबी तपासून शासन निर्णयाच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरुपात सोहन निकम यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास महापालिका सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.  यापूर्वी सोहन निकम हे स्थापत्य विभागात उपअभियंता पदावर कार्यरत होते. त्यांनी पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंता  या पदासाठी उप अभियंता या पदावर किमान ३ वर्षाच्या अनुभवाची अट पूर्ण केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागात कार्यकारी अभियंता या अभिनामाचे पद रिक्त आहे. या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यासाठी उप अभियंता या पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई आदी सेवा विषयक तपशील पडताळून शासन निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार कार्यकारी अभियंता पदावर महेश कावरे, संतोष दुर्गे, समीर दळवी यांची नियुक्ती करण्याच्या विषयास विशेष बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवरील जेष्ठ वैद्यकीय अधिकारी या अभिनामाची १६ रिक्त पदे भरण्याचे शासन मंजूर आहे. त्यानुसार जेष्ठ वैद्यकीय अधिकारी हे पद पदोन्नतीने भरण्यासाठी वैद्यकीय अधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई आदी सेवाविषयक तपशील पडताळून शासन निर्णयानुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार जेष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. वर्षा घोगरे आणि डॉ. शंकर मोसलगी यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास महापालिका सभेत मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या आस्थापनेवर निवासी वैद्यकीय अधिकारी अभिनामाची २ पदे शासन मंजूर आहे. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी या पदावरील अधिकारी यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई हे सेवाविषयक बाबी पडताळून शासन निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर डॉ. लक्ष्मीकांत अत्रे यांना पदोन्नतीने नियुक्त करण्याच्या विषयास मान्यता देण्यात आली.

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर सहाय्यक आयुक्त या अभिनामाची १४ पदे शासन मंजूर आहे. त्यानुसार सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यासाठी प्रशासन अधिकारी या पदावरील अधिकारी यांची शैक्षणिक अर्हता, अनुभव कालावधी, सेवाजेष्ठता, गोपनीय अहवाल, मत्ता व दायित्व, संगणकीय अर्हता, शिस्तभंग विषयक कारवाई आदी सेवाविषयक अहवाल पडताळून शासन निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाजेष्ठतेनुसार नाना मोरे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्याच्या विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी महापालिका सभेत मान्यता दिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments