सारसबाग चौपाटीची पुनर्रचना करून तेथे फूड आणि वॉकिंग प्लाझा विकसित करण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या पूर्वगणन समितीने (एस्टिमेट) मान्यता दिली आहे. भवन विभागाच्या माध्यमातून हा प्लाझा उभारण्यात येणार असून, त्यासाठी आठ कोटी ७३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नुकत्याच सादर अर्थसंकल्पात त्यासाठी साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महापालिकेने या परिसरात ५३ जणांना व्यवसाय परवाने दिले आहेत. मात्र, व्यावसायिकांनी स्टॉलला हॉटेलचे स्वरूप दिले असून अनेकांचे कामगारही तेथेच राहतात. त्यामुळे नियमभंग होत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने १४ मे २०२२ रोजी येथील ५३ स्टॉल सील केले होते. यानंतर पथारी व्यावसायिक संघटनांनी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. यावर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सारसबाग चौपाटी येथे अतिक्रमण होऊ नये, यासाठी तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची सोय व्हावी, यासाठी वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, सर्व स्टॉलधारकांना एकसारखे स्टॉल दिले जाणार आहेत. स्टॉलची रचना आकर्षक असेल. प्रत्येक स्टॉलपुढे मर्यादित टेबल-खुर्च्यांची सुविधा असणार आहे. त्याचेप्रमाणे नागरिकांना फिरण्यासाठी खास पादचारी मार्ग केला जाणार आहे.
सारसबागेच्या बाहेरील स्टॉलचे नियमन अतिक्रमण विभागातर्फेच केले जात होते. त्यामुळे येथे प्रस्तावित फूड व वॉकिंग प्लाझाचे कामही अतिक्रमण विभागातर्फेच केले जाणार होते. त्याचा आराखडा तयार करणे ते एस्टिमेट मान्य करून घेण्याची व अन्य मान्यतांची कामेही अतिक्रमण विभागानेच केली आहेत. त्यासाठी अतिक्रमण विभागासाठी शुक्रवारी संपलेल्या आर्थिक वर्षात दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, आज, शनिवारपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात सारसबाग फूड व वॉकिंग प्लाझासाठी भवन विभागाच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.