१ एप्रिल २०२१,
पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी नगरसेवक सचिन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना सचिव व खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या पत्रकातून दिली आहे. तर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
योगेश बाबर यांची १७ जानेवारी २०१८ रोजी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. मागील तीन वर्षांपासून बाबर यांच्याकडे शिवसेना शहरप्रमुखपद होते. त्यांच्या जागी नगरसेवक सचिन भोसले यांची निवड करण्यात आली आहे. २०१७ च्या निवडणुकीत भोसले थेरगावातून महापालिकेवर निवडून आले आहेत. त्यांची पहिलीच टर्म आहे. ते वकील आहेत.
मागील साडेचार वर्षात त्यांना महापालिकेतील महत्वाचे पद मिळाले नव्हते. स्थायी समिती सदस्यत्वासाठी ते तीव्र इच्छुक होते. पण, त्यांना संधी मिळाली नाही. अखेर भोसले यांना शहरप्रमुखपद बहाल केले आहे. त्यांचाकडे पिंपरी, चिंचवड, भोसरीची जबाबदारी दिली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भोसले यांची निवड केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, माजी शहरप्रमुख योगेश बाबर यांची पिंपरी, चिंचवड, भोसरीच्या जिल्हा सहसंपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. तर, गजानन चिंचवडे यांची मावळ, चिंचवड, पिंपरीच्या जिल्हाप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली आहे.