पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित पाटीलनगर टाळगाव चिखली जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. तसेच जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ अंतर्गत सुरू झालेले स्कूल अँड ज्युनियर कॉलेज हे महाराष्ट्र स्वयं अर्थसंहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम २०१२ अंतर्गत स्वयं अर्थसहाय्यित तत्वावर चालविण्यात येत आहे.
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये नर्सरी वर्गासाठी १६० विद्यार्थी, ज्युनियर के.जी वर्गासाठी ९० विद्यार्थी, सिनियर के.जी वर्गासाठी ९० विद्यार्थी, इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी ८८ विद्यार्थी, दुसरीच्या वर्गासाठी ८० विद्यार्थी, तिसरीच्या वर्गासाठी ४० विद्यार्थी, चौथीच्या वर्गासाठी ४० विद्यार्थी, पाचवीच्या वर्गासाठी ५२ विद्यार्थी, सहावीच्या वर्गासाठी ७ विद्यार्थी व सातवीच्या वर्गासाठी ४० विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. ज्या वर्गाच्या क्षमतेपेक्षा प्रवेश अर्जाची मागणी जास्त असेल त्याच वर्गाचे प्रवेश अर्ज निश्चित करणेकामी सोडत पद्धत (लॉटरी) अवलंबिण्यात येईल.
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) नियमानुसार अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन व अध्यापन प्रणाली इंग्रजी माध्यमातून असेल त्यामध्ये मराठी, हिंदी व संस्कृत भाषेचा विषय म्हणून समावेश असेल. तसेच भारतीय संत साहित्य आध्यात्मिक व सांस्कृतिक अभ्यासक्रमाची जोड असेल.
संतपीठ प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम चौकशी फॉर्मचे वाटप करण्यात येईल व फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२३ राहील. पात्र अर्जामधून जागांच्या उपलब्धतेनुसार सोडत पद्धतीने विद्यार्थांची निवड करण्यात येईल. तसेच आर.टी.ई च्या नियमानुसार नर्सरी वर्गासाठी आरक्षण लागू राहील.
सदर शाळेमध्ये प्रवेश निश्चित विद्यार्थांसाठी पूर्व प्राथमिक वर्गांसाठी प्रती विद्यार्थी र.रु २०,०००/- इयत्ता पहिली ते तिसरी वर्गाकरिता र.रु २७,०००/- इयत्ता चौथी ते पाचवी वर्गाकरिता ३२,०००/- ठरविण्यात आले होते. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता सहावी व सातवीचे वर्ग सुरु करणेत येणार आहेत. त्यासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थांसाठी र.रु ३२,०००/- व इयत्ता सातवीच्या विद्यार्थांसाठी र.रु ३५,०००/- शैक्षणिक शुल्क असेल तसेच शैक्षणिक साहित्य, वाहतूक खर्च वेगळा असेल.