पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्लूएस) आणि अल्प उत्पन्न गटासाठी (एलआयजी) १,६०४ घरे असणार असून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या घरांसाठी आज पासून (ता. २) नोंदणी सुरू होणार आहे . अर्जासाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
निगडी प्राधिकरण हद्दीतील पेठ क्रमांक १२ (मोशी) मध्ये आर्थिकदृष्ट्या मागासवर्गींसाठीच्या ३१ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील ८२४ सदनिका आहेत. तर पेठ क्रमांक ३० आणि ३२ (वाल्हेकरवाडी) येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीच्या ३६६ आणि अल्प उत्पन्न गटासाठी ४१४ सदनिका आहेत. मोशी येथील ईडब्लूएस गटातील सदनिका या २९.५५ चौ. मीटर असून त्यांची किंमत ७ लाख ४० हजार रूपये निश्चित केली आहे. यासाठी ऑनलाइन लॉटरी सुरू करण्याच्या कामाचा शुभारंभ पीएमआरडीएचे आयुक्त राहूल महिवाल यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी अतिरिक्त आयुक्त बन्सी गवळी, मनिषा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
एलआयजी गटातील सदनिका या ५९. ५७ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या असून त्याची किंमत ३२ लाख रूपये आहे. वाल्हेकरवाडी येथील ईब्लूएस गटातील सदनिका या २५.५२ चौरस मीटरच्या असून त्यांची किंमत १८ लाख ८० हजार ८२४ रूपये निश्चित केली आहे. तर एलआयजी गटासाठीच्या सदनिका या ३४.५७ मीटर असून त्याची किंमत २५ लाख ४७ हजार ८०९ रूपये आहे. या घरांसाठी नागरिकांना शुक्रवारपासून (ता. २) www.pmrda.gov.in अथवा http://www.lottery.pmrda.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करता येल. तर अधिक माहितीसाठी ०२२६२५३१७२७ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पीएमआरडीएने केले आहे.