Friday, September 11, 2026
Homeअर्थविश्वराहुल गांधींच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमासाठी पुण्यात उत्सुकता ; काँग्रेस-अभाविप आमनेसामने

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमासाठी पुण्यात उत्सुकता ; काँग्रेस-अभाविप आमनेसामने

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमाचे आज, शनिवारी (२२ ऑगस्ट) पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. आरटीओजवळील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार असून, राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमासाठी तब्बल ४२ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. प्रवेशद्वार, वाहनतळ, प्रमुख चौक तसेच परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची तपासणी आणि पार्किंग व्यवस्थेवरही पोलिसांचे लक्ष राहणार आहे.

दरम्यान, कार्यक्रमामुळे पुणे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेसाठी सुमारे ७०० वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

‘युवा की आवाज’ कार्यक्रमाचेही आयोजन

दरम्यान, युवकांमध्ये देशभक्तीची भावना दृढ करण्यासोबतच राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम् कृती समिती, पुणे’च्या वतीने आज ‘युवा की आवाज’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात सायंकाळी पाच वाजता संपूर्ण ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन आणि देशभक्तिपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.

‘छात्रों की गूँज’च्या पूर्वसंध्येला काँग्रेस-अभाविप आमनेसामने

राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूँज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पुण्यात काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, एनएसयूआयचे कार्यकर्ते सीओईपीच्या वसतिगृहात जाऊन विद्यार्थ्यांना राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दबाव टाकत होते. विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देण्यासाठी धमकावले जात असल्याचा आरोपही करण्यात आला.

तर, युवक काँग्रेसने अभाविपचे कार्यकर्ते सीओईपी परिसरात येऊन विद्यार्थ्यांना राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याबाबत धमकावत असल्याचा आरोप केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घटनास्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, काँग्रेस आणि अभाविपचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

राहुल गांधींच्या आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांसमोर मोठी गर्दी, वाहतूक आणि सुरक्षेचे आव्हान असणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments