२ नोव्हेंबर २०२०,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोविड-१९ रोगाचा प्रार्दुभाव किती झाला आहे. हे पाहण्याकरिता तसेच किती लोकांमध्ये याबाबत रोग प्रतिकार शक्ती निर्माण झाली यासाठी नागरिकांची सार्स-कोविड-२ आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणी मोहिम दि.७/१०/२०२० ते १७/१०/२०२० दरम्यान राबविण्यात आली होती.पिंपरी चिंचवड महापालिका आणि डॉ. डी वाय पाटील रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा सिरो स्वर्हे करण्यात आला.
या मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी १० पथके तयार करण्यात आलेली होती या पथकांकडून सदरचे सर्वेक्षण १० दिवस करण्यात आले असून ५००० नागरिकांचे रक्त नमुने घेण्यात आले होते. मोहिमेच्या सर्वेक्षणासाठी घेतलेल्या नमुन्यांची आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज तपासणीसाठी आय.सी.एम.आर व्दारे प्रमाणित अबॉट सीएमआयए टेस्ट व्दारा करण्यात आली आहे.
महिलांमधील पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज चा दर पुरुषांपेक्षा जास्त आहे. नागरिकांमध्ये सर्वसाधारण ३३.९%,पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज वयानुसार ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळून आले असून त्याचा दर ३५.५% इतका आहे. किशोरवयीन १२ ते १८ वर्षाच्या मुला-मुलींमध्ये ३४.९% इतका आहे. १९ ते ३० वयोगटामध्ये २९.७%, ३१ ते ५० वयोगटामध्ये ३१.२% व ६६ वर्षांवरील नागरिकांमध्ये २८.२% इतका आहे.कोविड-१९ मुळे असणारा सर्वसामान्य मृत्यु दर ०.१८% इतका आहे.
सदरील सर्वेक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील ब-याच मोठया प्रमाणातील लोकसंख्येमध्ये पॉझिटिव्ह आय.जी.जी.ऍन्टीबॉडीज दिसून आलेल्या आहेत. परंतु भविष्यात दिवाळी सण व हिवाळा असल्याकारणामुळे कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतरभान ठेवणे आणि हात वारंवार धुणे आदी कोरोना विषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

पिंपरी चिचंवड शहरामध्ये महापालिका आणि डॉ. डी वाय पाटील यांच्या विद्यमाने ७ ते १७ ऑक्टोबर या कालवधीत दहा दिवसांचा सिरो सर्व्हे करण्यात आला. त्या सर्व्हेमधून शहरातील करोनाबाबत निघालेल्या निष्कर्षा बाबत महापालिका भवनमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षेनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, कोविड तांत्रिक समितीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे, डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेजचे डॉ. अमित बॅनर्जी, डॉ. भार्गव गायकवाड, डॉ. अतुल देसले उपस्थित होते.