Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्रअँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्ट चित्रपटाला मिळाला इफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या ICFT-UNESCO गांधी...

अँथनी चेन दिग्दर्शित ड्रिफ्ट चित्रपटाला मिळाला इफ्फी 54 मध्ये प्रतिष्ठेच्या ICFT-UNESCO गांधी पदकाचा बहुमान

जीवनातील अनिश्चिततेतून अनपेक्षित बंध कसे निर्माण होतात याचे चित्रण करणारा चित्रपट
अँथनी चेन दिग्दर्शित फ्रेंच, ब्रिटिश आणि ग्रीक सह-निर्मितीच्या ड्रिफ्ट या चित्रपटाला 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयसीएफटी-युनेस्को (ICFT-UNESCO) गांधी पदक या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा चित्रपट नशिबाच्या फेऱ्यात सापडलेल्या एका स्थलांतरित महिलेची भावनिक फरफट चित्रित करतो, जिला मानवी प्रवृत्तीच्या भयानक, क्लेशकारक वास्तवाचा वारंवार सामना करावा लागतो. गोव्यामध्ये इफ्फी महोत्सवाच्या भव्य समारोप समारंभात आज या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

ड्रिफ्टमध्ये सिंथिया एरिव्होने साकारलेली नायिका ‘जॅकलीन’ ही एक तरुण निर्वासित आहे, ग्रीक बेटावर उतरलेली ही एकटी आणि निराधार स्त्री जगण्यासाठी संघर्ष करते आणि नंतर तिच्या भूतकाळाशी सामना करते. जगण्याचे बळ एकवटताना, आलिया शौकतने साकारलेल्या एका भटक्या टूर गाईडशी तिची मैत्री होते, आणि त्या दोघीजणी एकत्र येऊन पुढे जाण्याचा चिवट लढा देतात. जीवनातील अनिश्चिततेतून कसे अनपेक्षित बंध निर्माण होतात, याचे चित्रण हा चित्रपट दाखवतो. आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी या हृदयस्पर्शी चित्रपटाची निवड करताना, ज्युरींनी असे निरीक्षण नोंदवले, की हा चित्रपट आशा आणि चिवट लढ्याच्या छटा चितारतो.

आयसीएफटी-युनेस्को चे उपाध्यक्ष सर्ज मिशेल, आयसीएफटी-युनेस्को च्या प्लॅटफॉर्म फॉर क्रिएटिव्हिटी अँड इनोव्हेशन (PCI) च्या संचालक झेयून हून, आणि महोत्सव संचालक प्रितुल कुमार यांनी हा पुरस्कार प्रदान केला.

22 जानेवारी 2023 रोजी सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ड्रिफ्टचा वर्ल्ड प्रीमियर झाला. हा चित्रपट अलेक्झांडर मॅकसिक यांच्या ‘अ मार्कर टू मेजर ड्रिफ्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. अलेक्झांडर मॅकसिक आणि सुझैन फॅरेल यांनी एकत्रितपणे चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. यंदाच्या इफ्फी मध्ये आयसीएफटी-युनेस्को गांधी पदकासाठी जगभरातील दहा चित्रपटांमध्ये स्पर्धा होती.

आयसीएफटी पॅरिस आणि युनेस्को द्वारे स्थापित, गांधी पदक ही महात्मा गांधी यांच्या शांतता, अहिंसा, करुणा आणि वैश्विक बंधुतेच्या दृष्टीकोनाचे उत्कृष्ट प्रतिबिंब असलेल्या चित्रपटाला इफ्फी मध्ये सादर केलेली वार्षिक आदरांजली आहे. 2015 मध्ये 46 व्या इफ्फी मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून हा पुरस्कार या चिरस्थायी मूल्यांना मूर्त रूप देणाऱ्या चित्रपटांचा गौरव करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments