पिंपरी चिंचवड शहरामध्ये H3N2 विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 ने दुसरा बळी घेतला आहे. शहरातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेला H3N2 विषाणूची लागण झाली होती. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या मृत्यूमुळे H3N2 विषाणूच्या मृतांची संख्या २ झाली आहे. शहरात आत्तापर्यंत H3N2 च्या १७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १५ रुग्णांनी यावर मात केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एक जानेवारीपासून H3N2 बाधित १७ रुग्ण आढळले. त्यापैकी १५ रुग्ण बरे झाले आहेत. सोमवारी ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. १६ मार्च रोजी भोसरीतील एका वृद्धाचा मृत्यू झाला होता. सद्यस्थितीत एकही रुग्ण शहरात नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात सध्या कोरोना आणि सोबतच H3N2 विषाणूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात कोरोनाचे राज्यात सगळ्यात जास्त रुग्ण पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. त्यामुळे राज्यात नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. सोबतच H3N2 विषाणूचेही रुग्ण राज्यात वाढत आहे. त्यात आता पिंपरी-चिंचवडमध्ये वृद्ध महिलेला बळी गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही काळजी घ्यावी..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. वैद्यकीय विभागाने म्हटले आहे की, इन्फ्लुएंझा H3N2 या विषाणूस घाबरुन जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इ. लक्षणे असल्यास त्वरीत नजीकच्या महापालिकेच्या दवाखाना, रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पोष्टीक आहार घ्या, धुम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्यावे. लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासाख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. सदर आजारावर औषधोपचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. नागरीकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा.
– डॉ.लक्ष्मण गोफणे सहा.आरोग्य वैद्यकिय अधिकारी तथा वैद्यकिय विभागप्रमुख.