अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता औरंगाबादच्या (Aurangabad) सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्स समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघतात 20 जण जखमी झाले असून, त्यातील 11 जणांना उपचार करुन सोडण्यात आले आहे. तर 9 जणांवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.
1 जुलै रोजी बुलढाणा येथील खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याने 25 प्रवाशांनी आपला जीव गमवला. विशेष म्हणजे या घटनेनंतर देखील समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची मालिका सुरुच आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात सुरु आहे. दरम्यान औरंगाबादच्या सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघात झाला असून, यात 20 जण जखमी झाले आहेत. तर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घाटी रुग्णालयात हलवले. सध्या 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, 11 जणांवर प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले आहे.
दरम्यान आणखी एका घटनेत जालना येथील समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका समोर आली आहे. चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार उलटल्याची घटना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील जालना जिल्ह्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यात सात जण जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. भरधाव कार क्रमांक (एमएच 47- क्यू 2249) ही नागपूरहून मुंबईकडे जात होती. जालना जिल्ह्याच्या हद्दीत आल्यावर कार उलटली. यात सय्यद मुसेफ (वय 25 वर्षे), आश्रिया बेगम (34 वर्षे), शेख हरुण (वय 38 वर्षे), सय्यद झकेरिया (वय 8 वर्षे), सय्यद फातिमा (वय 1 वर्षे), तसलीम शेख (वय 46 वर्षे), अब्दुल गुरमीत (वय 25 वर्षे, सर्व रा. परभणी) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
राज्याच्या विकासात मोठा योगदान ठरणार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. मात्र समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून सतत होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत आला आहे. रोज छोटे-मोठे अपघात या महामार्गावर सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी योग्य उपयोजना करण्याची मागणी केली जात आहे.