२८ नोव्हेंबर २०२०,
विदेशी चलन प्रकरणात पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात भोसले यांची काल सुमारे १० तास चौकशी करण्यात आल्याचे वृत्त आहे. सकाळी १० वाजता भोसले ईडी कार्यालयात पोहचले होते. त्यानंतर रात्री ८ च्या सुमारास ते तिथून बाहेर पडले. त्यांनी माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही तसेच ईडीनेही याबाबत अद्याप अधिकृतरित्या काहीही सांगितलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने पुण्यात अविनाश भोसले यांच्या काही ठिकाणांवर छापे मारले होते. त्यानंतर ईडीने भोसले यांना चौकशीसाठी बोलावले होते आणि त्यानुसारच भोसले आज सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात पोहचल्याचे सांगण्यात येत आहे. विदेशी चलन प्रकरणात फेमा (FEMA) कायद्यांतर्गत भोसले यांची चौकशी करण्यात आली व त्यांच्याकडील कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. यापूर्वीही अनेक कारणांनी त्यांचे नाव चर्चेत राहिले आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात भोसले यांचा दबदबा राहिला आहे. याआधी आयकर विभागाकडूनही भोसले यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
अविनाश भोसले यांनी २००७ मध्ये परदेशातून महागड्या वस्तू आणल्याने तसेच परदेशी चलन बाळगल्याने ईडीने फेमा अंतर्गत तेव्हा तपास केला होता. मात्र, आता नेमकी कोणत्या प्रकरणात भोसले यांची चौकशी करण्यात येत आहे, हे मात्र ईडीकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. भोसले यांची आज मुंबईत चौकशी करण्यात आली, या माहितीला मात्र ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजारो दिला आहे. एखाद्या व्यक्तीने सीमाशुल्क बुडवल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फेमा अंतर्गत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे, असे संबंधितांनी सांगितले.