पुणे शहरात पुन्हा एकदा भररस्त्यात कोयता हल्ल्याचा थरार घडला आहे. पाठलाग करत तरुणावर वार करण्यात आले. मात्र सदर तरुणाने ऐनवेळी दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याचे प्राण वाचले आहेत.
पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्यासह इतर धारदार शस्त्रांनी वार करून त्याला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरुणाने धाव जाऊन एका घरात आश्रय घेतल्यामुळे थोडक्यात त्याचा जीव वाचला. हा सगळा थरार काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या हडपसर भागातील म्हाडाच्या नवीन वसाहतीत घडला असून पोलिसांनी रेकॉर्डवरील एका आरोपीला अटक केली आहे.
कंठया (रा . गंगानागर हडपसर), पिरम्या उर्फ पीटऱ्या ( रा. रामटेकडी), पंक्या (रा. काळेपाडी), राहुल दोडे, मुस्तफा उर्फ खड्डा शेख (वय २० रा. नवीन म्हाडा वसाहत हडपसर) अशी गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी मुस्तफा उर्फ खड्डा शेख याला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणात शुभम शरद भंडारी (वय २६ रा. आय.टी. सी कंपनी रांजणगाव ) याने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जुना वाद आहे. या वादाचा राग मनात धरून आरोपी कंठया याने दि ६. रोजी मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास फिर्यादी याला त्याच्या भावाच्या घरी जाताना पाहिले होते. त्यानुसार फिर्यादी तिथून बाहेर पडण्याची वाट पाहत सगळेच आरोपी थांबले होते. फिर्यादी त्याच्या भावाच्या घरून आपली गाडी घेऊन निघाला. तेव्हा कंठ्या आणि त्याच्यासोबत असलेल्या आरोपींनी त्याचा पाठलाग केला. मात्र याची कुणकुण फिर्यादीला लागली. त्याने गाडी पुन्हा आपल्या भावाच्या घरी वळवली आणि भावाच्या घरी जाण्यासाठी गाडीतून उतरून धाव घेतली. मात्र आरोपी कंठ्या आणि इतरांनी फिर्यादी तरुणाला जिन्यात गाठत त्याच्या पाठीवर वार केला.
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी फिर्यादी हा पहिल्या माजल्यावर असलेल्या शाम लोखंडे यांच्या घरात शिरला. त्यानंतर आरोपी कंठ्या याने फिर्यादीला म्हणाला की, “तू माझा मित्र बसवराज कांबळे याचा खून केला. मी आता तुला जिवंत नाही सोडणार. तुझी आता विकेटच पाडतो.”
दरम्यान, त्यानंतर आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादीची गाडी फोडत शिवीगाळ केली आणि तिथून निघून गेले. मात्र या घटनेनंतर परिसरात मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहे.