Saturday, March 22, 2025
Homeआरोग्यविषयकपुण्यात करोनामुळे आणखी एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

पुण्यात करोनामुळे आणखी एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा मृत्यू

३ एप्रिल २०२१,
जिल्ह्याचे माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचं आज पहाटे करोनामुळं निधन झालं. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळं प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

चार दिवसांपूर्वी सरग यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला. खबरदारी म्हणून २६ मार्च रोजी त्यांनी करोना चाचणी करून घेतली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रक्तातील साखर वाढल्यानं त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळं त्यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते मोफत व्यंगचित्र करून देत असत. मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळं त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. प्रशासकीय कौशल्य व आजवरचे काम पाहून येत्या आठवड्यात सरग यांना बढती दिली जाणार होती. मंत्रालयातून तशी माहिती देण्यात आली होती. दुर्दैवानं त्यांची ही संधी हुकली.

राजेंद्र सरग यांची पत्नी व एका मुलाला देखील करोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments