Thursday, February 6, 2025
Homeगुन्हेगारीकिवळे दुर्घटनेतील नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करा - अजित गव्हाणे

किवळे दुर्घटनेतील नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करा – अजित गव्हाणे

महापौर निधीतून पैसे देण्यापासून आयुक्तांना कोणी रोखले आहे का?

किवळे येथील होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना तात्काळ मदत करणे अपेक्षित असतानाही महापालिका आयुक्त त्याकडे दूर्लक्ष करून असंवेदनशीलतेचा कळस करत आहेत. या दुर्घटनेतील नागरिकांना आयुक्तांनी मदत करण्यापासून आयुक्तांना कोणी रोखले आहे का? आयुक्तांनी या नागरिकांना तात्काळ मदत जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे.
याबाबत अजित गव्हाणे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे किवळ्यातील दुर्घटना घडली आहे. महापालिका आयुक्त हेच सध्या प्रशासक म्हणून महापालिकेचे प्रमुख आहेत. दुर्घटना घडल्यानंतर मृतांच्या व जखमींच्या नातेवाईकांना मदत घोषित करणे अपेक्षित होते. मात्र, चार दिवसानंतरही आयुक्तांनी ही मदत घोषित केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिकेच्या कारभाराबाबत व आयुक्तांबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आयुक्तांना ही मदत जाहीर करण्यापासून कोणी रोखले आहे का? असा प्रश्नही गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे.

महापालिकेचे प्रमुख या नात्याने आयुक्तांनी तात्काळ मदत घोषित करावी. तसेच यापुढे शहरात एकही अनधिकृत होर्डिंग उभे राहू नये यासाठी धोरण तयार करावे. होर्डिंगला परवानगी देण्याची सध्याची पद्धत अतिशय किचकट असून त्यामुळे सुटसुटीतपणा आणावा, सध्या अस्तित्त्वात असलेल्या व नव्याने परवानगी दिल्या जाणार्‍या प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणीही गव्हाणे यांनी केली आहे.

महापौर निधीमधून मदत करा..
लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून ज्यावेळी महापालिकेचा कारभार चालविला जात होता, त्यावेळी महापौर निधीमधून तात्काळ मदत उपलब्ध करून दिली जात होती. सध्या महापौरांचे पूर्ण अधिकार प्रशासक या नात्याने आयुक्तांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्तांनी महापौर निधीतून शहरातील नागरिकांना नियमानुसार मदत देण्यास सुरुवात करावी, अशी मागणीही अजित गव्हाणे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments