‘अॅनेमिया मुक्त पिंपरी चिंचवड’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता आणि व्यापक पद्धतीने काम करुन शहराला अॅनेमिया मुक्त करा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले.
महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑंटोक्लस्टर सभागृहात अॅनेमिया मुक्त पीसीएमसी’ मोहीम पूर्व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपायुक्त संदीप खोत, डॉ.डी. वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग विभागप्रमुख डॉ. शरद आगरखेडकर यांच्यासह एएनएम, विविध शाळांचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच खाजगी,वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती या चर्चासत्रास उपस्थित होते .
आयुक्त पाटील म्हणाले, भारतात रक्तक्षय झालेल्या व्यक्तींचे प्रमाण पाहता ही चिंतेची बाब आहे. हे चित्र बदलण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहेत. केंद्र शासनाने ‘अॅनिमिया मुक्त भारत’ अभियान सुरु केले आहे. या धर्तीवर महापालिका कार्यक्षेत्रातही अशी मोहीम राबवण्यात येत आहे. शिक्षण आणि जागरूकता या बाबी मोहीम यशस्वीतेसाठी महत्वाच्या आहेत. ग्रामीण भागात मोहिमा सहजतेने यशस्वी होतात, मात्र शहरी भागातील वाढती लोकसंख्या आणि रचना पाहता अशा मोहिमा यशस्वी करणे अवघड जाते. यासाठी चर्चासत्र घेऊन सुनियोजित व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहराला अॅनेमिया मुक्त करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक वयोगटातील तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून या विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्न करणार आहे. ही योजना यशस्वी पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी विशिष्ट अंमलबजावणी धोरण तयार करण्यात आले आहे. शिक्षित कुटुंबातही अॅनिमिया बद्दल जागरूकता कमी असल्याचे बघायला मिळते. अॅनिमियामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ कमी होणे तसेच संसर्गजन्य रोगास बळी पडणे यासारखे दुष्परिणाम होतात. या आजाराची व्याप्ती खूप मोठी असून त्यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. यात येणाऱ्या समस्यांवर मात करून या मोहिमेला बळकट करायचे आहे. या मोहिमेसाठी व्यापक व्यवस्थापन करण्यासाठी चर्चासत्राच्या माध्यमातून मार्ग सापडतील. या विषयाकडे सर्वांनी संवेदनशीलतेने पाहावे.असे आयुक्त पाटील यावेळी म्हणाले.
या मोहिमेंतर्गत अनेक उपक्रम राबवण्यात येणार असून त्यावर कशा पद्धतीने कार्यवाही करावी यासाठी या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. ‘अॅनेमिया मुक्त पीसीएमसी’ या उपक्रमाचे १०० टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामुख्याने ६ महिने ते १९ वर्षे वयोगटातील मुले-मुली, गर्भवती व स्तनदा माता आणि वय २० ते ४९ वयोगटातील प्रजननक्षम महिला यांच्यातील लोहाची कमतरता तसेच रक्तक्षय ओळखून त्यावर प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यात प्रतिबंधात्मक जंतनाशक गोळी, प्रतिबंधात्मक आयर्न फोलिक अॅसिड गोळी तसेच रक्तक्षयाकरता चाचणी आणि उपचार याचा समावेश आहे.