नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कंगना रणौत विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी 1 मार्चला होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचे आदेश दिले असतानाही न्यायालयात हजेरी न लावल्यानं अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केलं आहे.
1 फेब्रुवारी 2021ला झालेल्या सुनावणीत न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत पुढील म्हणजेच 1 मार्च ला हजर राहण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर वेळेपूर्वीच आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर झाले होते. मात्र कंगनाने याला आपली गैरहजेरी दर्शवली. यामुळे 26 मार्चला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कंगनाला बजावण्यात आले आहेत. आजच्या सुनावणीसाठी कंगनाच्यावतीने तिच्या वकिलांनी न्यायालयात हजेरी लावली होती.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन दिग्गज सेलिब्रिटींवर ताशेरे ओढले. ऋतिक रोशन आणि कंगनामध्ये पेटलेल्या वादात ‘जावेदजींनी आपल्याला गप्प बसण्याचा सल्ला दिला होता’ असा आरोप कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर केला. एका मुलाखतीत तिने त्यांच्यावर हे आरोप केले. “रोशन कुटुंबीयांसोबत वाद ओढावून घेतलास तर ते तुला जेलमध्ये टाकतील.” या शब्दात जावेद अख्तर यांनी दबाव टाकला असल्याचं कंगना या मुलाखतीमध्ये म्हणाली होती. यानंतर कंगनाने केलेले आरोप फेटाळून लावत जावेद अख्तर यांनी कंगना विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली होती.