Saturday, December 9, 2023
Homeताजी बातमीआणि… पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याचं अजितदादांचं स्वप्न भंगलं….!

आणि… पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याचं अजितदादांचं स्वप्न भंगलं….!

पिंपरी चिंचवडवरचं २०१७ नंतर गमावलेलं अस्तित्व मिळविण्यासाठी अजित पवारांनी रात्रीचा दिवस केला. कित्येक बैठक घेतल्या, कार्यकर्त्यांना कामाला लावलं. आपल्या विश्वासू आमदाराकडे इथली प्रभारीपदाची जबाबदारी दिली. परंतुअजितदादांच्या नेतृत्वाखालील उमेदवार नाना काटेंना चिंचवडकरांनी नाकारलं. भलेही अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपच्या अश्विनी जगताप यांना झाला पण सरतेशेवटी राष्ट्रवादीच्या वाट्याला इथे पराभव आला आणि चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करण्याचं अजितदादांचं स्वप्न भंगलं.

सुरुवातीला राहुल कलाटे यांच्या नावावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमत झालं होतं. खासदार संजय राऊत यांनी चिंचवडच्या जागेवर दावा केल्याने अजित पवार यांनी प्लॅन केला आणि सूत्रे फिरवली. कलाटे राष्ट्रवादीतून लढतील, अशी शक्यता निर्माण केली. अजितदादांनी कलाटेंच्या नावावर शिवसेनेकडून ही जागा राष्ट्रवादीकडे घेतली आणि ऐनवेळी राहुल कलाटे यांच्याऐवजी आपले मर्जीतले नेते नाना काटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि चिंचवडची सगळी सूत्रं आपले खास आणि विश्वासू आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे सोपवली. नाना काटे जरी निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यावर आपला होल्ड कसा राहिल, याची पुरेपूर काळजी अजित पवार यांनी घेतली.

उमेदवार निश्चितीपासून संपूर्ण प्रचारयंत्रणेवर अजितदादा लक्ष ठेऊन होते. निवडणूक काळात तर अजितदादांनी चिंचवडमध्ये ठाण मांडलं. सगळे नगरसेवक-पदाधिकारी-कार्यकर्ते कामाला लावले. काहीही करुन काटेंना निवडून आणायचं, असा निर्धारच अजित पवार यांनी केला होता. कारण काटेंच्या विजयाने अजित पवार यांना चिंचवडमध्ये पुन्हा एन्ट्री करुन नव्या कारकीर्दीची सुरुवात करायची होती.

राहुल कलाटे यांनी जवळपास ४३ हजार मतं घेतली. कलाटे यांच्यामुळे मोठं मतविभाजन होऊन त्याचा फायदा अश्विनी जगताप यांना झाला. जर कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर थेट जगताप विरुद्ध काटे अशी लढत झाली असती आणि मतविभाजनही टळलं असतं. परंतु कलाटेंनी दादांचं म्हणणं काही ऐकलं नाही. शेवटी अजितदादांच्या प्रयत्नाला अपयश आलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments