पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात येथील भुमिपूत्रांसह उद्योग, व्यवसाय आणि सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या नागरीकांचे उल्लेखनीय योगदान आहे. त्यातील निवडक मान्यवरांचा योग्य सन्मान ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्क’च्या वतीने गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे करण्यात येणार आहे.त्यापैकी एक म्हणजे डॉ.पं. नंदकिशोर कपोते ,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक असलेल्या डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांना या वर्षीचा ” पिंपरी चिंचवड सन्मान ” पुरस्कार जाहीर झाला आहे, डॉ.पं. नंदकिशोर कपोते यांच्या अथक प्रामाणिक प्रयत्नांना मुळे पिंपरी चिंचवड चे नाव जागतिक पातळीवर पोहचवले आहे. त्यांच्या या कार्याचा ‘न्यूज १४ मिडीया नेटवर्कच्या’ वतीने केलेला हा छोटासा प्रयत्न ….
डॉ.पं. नंदकिशोर कपोते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथक नर्तक. पद्मविभूषण पं. बिरजू महाराजजींचे पट्ट शिष्य. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती व कथक नृत्यात पी. एच. डी.(डॉक्टरेट) मिळवणारे पहिले पुरुष नर्तक.
डॉ. नंदकिशोर कपोते हे एक कथ्थक नर्तक आहेत. पिंपरी चिंचवडमधील यमुनानगर (निगडी) येथे त्यांची ‘नंदकिशोर कल्चरल सोसायटी’ नावाची गायन, नृत्य, वाद्यवादन, हिंदुस्तानी शास्त्रीय कंठ संगीत, कर्नाटक कंठ संगीत आदी कला शिकवणारी संस्था आहे. नंदकिशोर कपोते यांनी दिल्लीत पं. बिरजू महाराज यांच्या घरी दहा वर्षे राहून नृत्यशिक्षण घेतले. नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यात पी.एच.डी मिळवली आहे.
महाराष्ट्र शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त (२००४). महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त (२०१०). पुणे महानगरपालिकेचा ” बालगंधर्व ” पुरस्कार प्राप्त (२०१४). लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मधे नृत्य कार्याची नोंद. (2018)
देशात व परदेशात रशिया ,अमेरिका , हॉलंड , कॅनडा , कुवेत , जपान , मलेशिया , इ. ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम. दिल्ली दूरदर्शनचे ” ए ” ग्रेड प्राप्त कलाकार. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची फेलोशिप प्राप्त कलाकार. चाळीस वर्षापेक्षा जास्त नृत्य क्षेत्रात कार्यरत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ , टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे , छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नवी मुंबई येथे नृत्य पी. एच. डी. (डॉक्टरेट) साठी मान्यताप्राप्त गाईड व परीक्षक म्हणून कार्यरत. अनेक चित्रपटांना नृत्य दिग्दर्शन. डॉ. पं. नंदकिशोर कपोते, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीचे मानद सल्लागार आहेत.
डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे १९९१ पासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या नृत्यनाटिकेचे प्रयोग करत आले आहेत. या नृत्यनाटिकेत सुमारे ७० कलाकार काम करतात. २५ वर्षांत या नृत्यनाटिकेचे अनेक प्रयोग झाले आहेत.
डॉ. नंदकिशोर कपोते यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची कथक नृत्यातील संशोधनासाठी सीनियर फेलोशिप जाहीर झाली आहे (२०१७). संपूर्ण भारतात कथक नृत्यासाठी ही सीनियर फेलोशीप मिळविणारे डॉ. नंदकिशोर कपोते हे पहिले नर्तक आहे. या फेलोशिपच्या माध्यमांतून डॉ. पं. नंदकिशोर कपोते हे प्राचीन ग्रंथ ‘अभिनयदर्पण’ आणि नाट्यशास्त्र यांतील हस्तमुद्रा आणि कथकनृत्य यांचा तुलनात्मक अभ्यास या विषयावर संशोधन करतील.कथक – इंडियन क्लासिकल डान्स आर्ट या पुस्तकाचे लेखक डॉ. सुनील कोठारी यांनी लिहिले आहे – तरुण पिढीपासून अनेक नर्तक उल्लेखनीय आहेत – त्यामध्ये नंदकिशोर कपोते यांचा समावेश आहे.
दरम्यान ” पिंपरी चिंचवड सन्मान ” पुरस्कार सोहळा गुरुवारी (दि. ७ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता ऑटो क्लस्टर हॉल चिंचवड येथे पद्मश्री गिरीश प्रभूणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी उपस्थित राहणार आहेत.