केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 6) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. केंद्र शासनाच्या एका कार्यक्रमात ते चिंचवड येथे सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू केली आहे.
केंद्रीय पंजीयक कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. याबरोबरच अमित शहा शुगर फेडरेशनच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत.यापूर्वी अमित शहांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या शिवसृष्टीचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळी पुणे दौरा केला होता. RSS चे संघाचे माजी सरकार्यवाह यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी ते पुण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अमित शहा शनिवारी रात्री पुणे शहरात येणार आहेत. रविवारी चिंचवड येथील कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी ते दिल्लीकडे रवाना होतील. केंद्रीय गृहमंत्री येणार असल्याने शहर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.
येत्या 2024 च्य़ा निवडणुकांसाठी भाजप पुण्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर त्यांनी लगेच आपला दौरा आखला आहे. त्यातच राज्यात सत्तानाट्यदेखील बघायला मिळालं. यंदा भाजपने अजित पवारांचीदेखील साथ घेतली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यात बारामती पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे.