कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा पुणे दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून निवडणुकीसाठीच या दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे. या दोन्ही मतदारसंघातील निवडणुका बिनविरोध करण्याचे भाजप नेत्यांचे आवाहन महाविकास आघाडीने धुडकावत उमेदवार दिले आहेत. शिंदे-फडवणीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने मोठा धक्का दिला होता. त्यामुळे पोटनिवडणूक जिंकण्याचा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारीला पुण्यात आहेत. अमित शहा यांच्या हस्ते ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी अमित शहा बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीत आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ‘मोदी ॲट ट्वेन्टी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मोठा सार्वजनिक कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात येणार आहे.