Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीमोशी-बोऱ्हाडेवाडीमध्ये अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचा शुभारंभ; नागरिकांसाठी आरोग्यदायी जीवनशैलीला चालना

मोशी-बोऱ्हाडेवाडीमध्ये अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाचा शुभारंभ; नागरिकांसाठी आरोग्यदायी जीवनशैलीला चालना

पिंपरी, दि. ०६ एप्रिल २०२६ : शहराचा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता नागरिकांच्या आरोग्यदायी, सक्रिय आणि आनंदी जीवनशैलीसाठी आवश्यक सार्वजनिक सुविधा उभारण्यावर महापालिकेचा भर असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. मोशी-बोऱ्हाडेवाडी येथील अ‍ॅमेनिटी स्पेस प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गट क्र. २३० व २३१ येथे साकारण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा शुभारंभ महापौरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधी समिती सभापती सुजाता बोराटे, माजी महापौर राहुल जाधव, निखिल बोऱ्हाडे, नगरसदस्या सारिका बोऱ्हाडे तसेच कार्यकारी अभियंता विजय जाधव, बाळासाहेब लांडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महापौर लांडगे म्हणाले की, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसर झपाट्याने विकसित होत असून नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अ‍ॅमेनिटी स्पेसमुळे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना एकाच ठिकाणी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे २ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून एस.एस. आर्किटेक्ट्स यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काम पूर्ण करण्यासाठी ९ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

प्रकल्पातील सुविधा :

या अ‍ॅमेनिटी स्पेसमध्ये व्हॉलीबॉल कोर्ट (४८० चौ.मी.), योगा कोर्ट (१६० चौ.मी.), बॅडमिंटन कोर्ट (३५० चौ.मी.), सॅन्ड पिट (जंगल जिम), बहुउद्देशीय मैदान (१५५० चौ.मी.), अम्फीथिएटर, पादचारी मार्ग, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह आणि पार्किंग अशा विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.

या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना क्रीडा व तंदुरुस्तीच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळणार असून महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित आणि सुसज्ज सार्वजनिक परिसर उपलब्ध होणार आहे. सामाजिक संवाद, आरोग्यवर्धन आणि सकारात्मक वातावरण निर्मितीसही यामुळे चालना मिळणार आहे.

एकूणच, मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरासाठी हा प्रकल्प विकासाचा नवा टप्पा ठरणार असून नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments