अंबानी यांच्या निवासस्थानी सापडलेल्या स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणातील संशयित सचिन वाझे यांना मोठी धक्का बसला आहे. सध्या कोठडीत असलेल्या वाझे यांना मुंबई पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. एनआयएकडून त्यांची चौकशी सुरू आहे. विशेष शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
हे ही वाचाः आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर
अंबानी स्फोटकं आणि मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव समोर आल्यानंतर हिरेन प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्यात आला. वाझे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. त्यानंतर एनआयएने वाझे यांची चौकशी करत शनिवारी रात्री त्यांना अटक केली होती.
अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात वाझे यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा ‘एनआयए’कडून करण्यात आलेला असून ‘‘हे कृत्य वाझे यांनी कबूल केले आहे. मात्र अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके ठेवणे, अंबानी कुटुंबाला धमकावण्याचा कट त्यांनी एकट्याने रचलेला नाही. या कटात अन्य व्यक्तीही सहभागी असाव्यात’’, असा संशय असल्याचे ‘एनआयए’कडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आज वाझे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. मुंबई पोलीस जनसंपर्क अधिकारी एस. चैतन्य यांनी यांची माहिती दिली.
हेही वाचाः पुण्यात मिसळीचा जागतिक विक्रम, सात तासात तब्बल सात हजार किलो मिसळ तयार करून वाटप