Sunday, June 15, 2025
Homeताजी बातमीमी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही - पंकजा मुंडे

मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही – पंकजा मुंडे

१३ जुलै २०२१,
मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवण्याचे प्रयत्नही संपले असते, अशा शब्दात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. पंकजा मुंडे यांच्या या विधानावरून भाजपमध्ये पंकजा यांच्याविरोधात राजकारण केले जात असल्याची जोरदार चर्चाही रंगली आहे.

पंकजा मुंडे यांनी वरळीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला. मनातील खदखद बोलून दाखवतानाच महाराष्ट्र भाजपातील राजकारणावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मात्र, पक्षातच सक्रिय राहण्याचे संकेतही त्यांनी दिले. मला प्रवास खडतर दिसतोय. मागेही खडतर होता. पुढेही खडतर आहे. मी आज निवडणुकीत पडले असले तरी संपले नाही. मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते. पण मी संपलेली नाही. मी आहे. मी तुमच्या जीवावर आहे, असं पंकजा म्हणाल्या.

अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा?
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना भविष्यातील सूचक संकेतही दिले. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते माझ्या भावांनो. अविचाराने कोणताही निर्णय का घ्यायचा? आपण सात्विक माणसं आहोत. 90 टक्के वारकरी आहोत. माझा पराभव झाला. कुणाचा पराभव झाला नाही? महाराष्ट्रात अनेकाचा पराभव झाला. मी त्याने हरले नाही, असं त्यांनी सांगितलं. प्रीतम मुंडे नाव असताना , त्या लायक असताना त्यांचं मंत्रिपद झालं नाही. पण डॉ. कराडांचं झालं. माझं वय 42. त्यांचं 65 आहे. मी 65 वर्षाच्या मंत्रिपदावर असलेल्या माझ्या समाजाच्या माणसाचा अपमान करावा हे संस्कार आहेत का माझे? मी का त्यांच्या पदाला अपमानित करू?, असा सवालही त्यांनी केला.

माझ्याकडे नसतील पक्षाचे, पदांचे अलंकार
मुळात ज्याला सौंदर्य असतं त्याला कोणत्याही अलंकाराची गरज नसते. ज्याला अलंकाराची गरज भासते ते मुळातलं सौंदर्य नसतं. आज माझ्याकडे नसतील पक्षाचे अलंकार, नसतील पदाचे अलंकार, पण माझं सौंदर्य तुम्ही आहात. पण त्याला गालबोट लावायचं नाही. ही शक्ती क्षीण करायची नाही. वाढवायची आहे. मी मांडलेला हा संसार मोडून जावं असं तुम्हाला वाटतं?, असा सवालही त्यांनी केला.

भाजपचं सरकार आल्यावरच या गोष्टी कशा बाहेर येतात.. ?
लोकांच्या मनातील मी मुख्यमंत्री आहे असं तुम्ही म्हटलं होतं. त्यामुळे तुम्हाला डावललं जात आहे, असं मला सांगण्यात आलं. मी त्यांना म्हटलं, मी स्वाभिमानाने राजकारण केलं. मुख्यमंत्री भाजपचा करायचा असं मी म्हटलं होतं. मला मुख्यमंत्री व्हायचं असं कधीच म्हटलं नाही. निवडणकू झाल्यावर भाजपचं सरकार आल्यावरच या गोष्टी कशा बाहेर येतात?, असा सवाल करतानाच या गोष्टी पेरल्या आहेत. मला अवमानित करण्यासाठी, माझ्या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी हे सुरू आहे. माझं रक्त काळं आणि त्यांचं रक्त गोरं आहे का? कुणी म्हणतं मला पंतप्रधान व्हायचं देशाचा ते चालतं का? ते चालतं का? मी का म्हणायचं नाही? पण मी म्हटलं नाही आणि म्हणणार नाही, असं त्या म्हणाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments