Wednesday, July 15, 2026
Homeताजी बातमीपत्राशेड लिंकरोड प्रकल्पांतील सदनिकांचे वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन करु - सुंदर...

पत्राशेड लिंकरोड प्रकल्पांतील सदनिकांचे वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन करु – सुंदर कांबळे

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०१० साली जेएनएनयुआरएम अंतर्गत २६ कोटी रुपयांचा ६७२ सदनिकांचा पत्राशेड लिंकरोड पुनर्वसन प्रकल्प मंजूर केला. तब्बल १२ वर्षांनंतर यापैकी ३३६ सदनिका तयार झाल्या आहेत. या सदनिकांची सोडत काढून लाभधारकांना ताबा पावती महापौर माई ढोरे यांच्या हस्ते कार्यक्रमात देण्यात आली. त्यावेळी महापौरांनी पंधरा दिवसात सदनिकांचा ताबा लाभधारकांना देण्यात येईल असे जाहिर आश्वासन दिले होते. परंतू अद्यापपर्यंत त्यांना सदनिकांच्या चाव्या देण्यात आल्या नाहीत. लाभधारकांना सदनिकांचा ताबा व चाव्या प्रशासनाने ताबडतोब द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिला.

गुरुवारी (दि. १७ फेब्रुवारी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात लाक्षणिक आंदोलन सुंदर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी शितल कोतवाल, प्रदीप कांबळे, अक्षय माछरे, अशोक गायकवाड, अशोक साबळे, रामा डोंगरे, ज्योती सुर्यवंशी, कुसूम झिंजडे, कुसूम भोळे, नितीन कर्डक, वंदना आराख, फातिमा शेख, वृषाली कदम, भारती क्षिरसागर, ज्योती कजानिया, ममता पवार, असरीफुल शेख आदी उपस्थित होते.

माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सुंदर कांबळे यांनी सांगितले की, या आंदोलनास नगरसेवक हिराचंद उर्फ डब्बुशेठ आसवाणी, निकीता कदम, माजी नगरसेवक गुरुबक्ष पहलाणी तसेच बाळासाहेब वाघमारे, भीमा गायकवाड आदींचा पाठिंबा आहे. या प्रकल्पातील लाभधारक गोरगरिब, कष्टकरी, मागासवर्गीय आहेत. त्यांना लाभापासून वंचित ठेवण्याचे कूटिल राजकारण भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक प्रशासनाला हाताशी धरुन करीत आहेत. या सदनिका तयार करण्यासाठी २६ कोटी रुपये आणि आता त्याच्या डागडूजीसाठी १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. ३३६ सदनिकाधारकांच्या ताबा पावत्या असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या माध्यमातून पाठपुरावा करुन मी मिळवून दिल्या. त्याचा राग भाजपाचे स्थानिक नगरसेवक मनात ठेवून व्देषापोटी लाभधारकांना ताबा देत नाहीत. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे देखिल प्रत्यक्ष भेटून पत्राव्दारे आम्ही मागणी केली आहे.

या लाभधारकांना ताबडतोब सदनिकांचा ताबा द्यावा असे आदेश पालकमंत्री अजितदादा पवार यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिले होते. पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे यांना देखिल याबाबत लाभधारकांनी लक्ष घालण्याची विनंती केली होती. यानंतरही आम्ही पाठपुरावा केला तरी देखिल प्रशासनाचे अंतर्गत हेवेदावे आणि भाजपाचे कुटिल राजकारण यामुळे नागरिकांना सदनिकांचा अद्यापही ताबा मिळाला नाही. आयुक्त राजेश पाटील हे पालकमंत्री व महापौरांचेही आदेश पाळत नाहीत. आता आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा अन्यथा लाभधारकांच्या कुटूंबांसह आयुक्तांच्या दालनासमोर तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी दिला

RELATED ARTICLES
- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments