Sunday, August 16, 2026
Homeअर्थविश्वमोशी कचरा डेपो दुर्घटनेत राजकीय हस्तक्षेपाचा आरोप; स्थानिक आमदार महेश लांडगेंवर रोहित...

मोशी कचरा डेपो दुर्घटनेत राजकीय हस्तक्षेपाचा आरोप; स्थानिक आमदार महेश लांडगेंवर रोहित पवारांचा गंभीर आरोप

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१ कोटी, कायमस्वरूपी नोकरी, घर आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देण्याची मागणी रोहित पवार यांनी केली 

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी महापालिका प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर गंभीर आरोप करत कठोर कारवाईची मागणी केली. दोषींना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांची भेट घेऊन मोशी दुर्घटनेची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. घनकचरा, पर्यावरण आणि इतर संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना केवळ निलंबित न करता कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, तसेच संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत, मोशी दुर्घटनेतील संबंधित कंत्राटदाराला वाचवण्याचे काम स्थानिक आमदार महेश लांडगे करत असून या प्रकरणात महापालिकेवरही त्यांचा दबाव असल्याचा आरोप केला. तसेच पर्यावरण विभागाचे अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यावरही महेश लांडगे यांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होत नसल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

रोहित पवार म्हणाले की, मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना संबंधित ठेकेदाराने प्रत्येकी एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी. त्याचबरोबर मृतांच्या वारसांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी, राहण्यासाठी घर आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी.

मोशी दुर्घटनेतील बचावकार्यात झालेल्या विलंबावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कुदळवाडीतील कारवाईसाठी शेकडो जेसीबी आणि यंत्रसामग्री उपलब्ध होती. मात्र मोशीतील कचऱ्याचा ढिगारा हटवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री महापालिकेकडे उपलब्ध नव्हती. ती पुण्यातून मागवावी लागली आणि ती येण्यासाठी तब्बल ३६ तासांचा विलंब झाला. ही यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध असती तर कदाचित काही निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते,” असा दावा त्यांनी केला.

मोशी कचरा डेपोमधून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित दूषित पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेतील सुमारे ६० ते ७० टक्के कॅमेरे बंद असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका असल्याचे सांगत संपूर्ण सीसीटीव्ही यंत्रणेचे स्वतंत्र ऑडिट करून बंद कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी मोशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या राहुल गायकवाड आणि अक्षय सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच इतर मृतांच्या कुटुंबीयांशीही चर्चा करून त्यांच्या न्यायाच्या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महापालिकेला या सर्व मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी १० दिवसांचा अवधी देत, या कालावधीत ठोस कारवाई न झाल्यास सामान्य पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने महापालिकेविरोधात ‘ताला ठोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.

पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते सुनील माने, रविकांत वरपे, विशाल वाकडकर, ज्योती निंबाळकर, देवेंद्र तायडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

(टीप : या आरोपांवर आमदार महेश लांडगे व संबंधितांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments