पिंपरी चिंचवड शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे, शिवाय धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये वाढ होत असल्याने नदीकाठच्या रहिवाश्यांना महापालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकाद्वारे सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. महापालिकेचे आपत्कालीन पथक अशा भागात प्रत्यक्ष गस्त घालीत असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतंत्र पथकाद्वारे दिवसरात्र नदीकाठच्या भागावर लक्ष ठेवले जात आहे. पिंपरी येथील महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय २४ तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
सातत्याने पडणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. मुख्य रस्त्यांवर पाणी साचून दळणवळण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो म्हणून क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले असून त्यांच्याद्वारे सातत्याने पाहणी केली जात आहे. चेंबरमध्ये कचरा अडकून पाणी तुंबू नये यासाठी आरोग्य पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी त्या भागात तात्काळ पाणी उपसा यंत्रणा वाहन पाठवून आवश्यक कार्यवाही करावी, तुटलेले चेंबर तात्काळ दुरुस्त करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. रस्त्यांवर झालेले खड्डे बुजवावेत, तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशदेखील आयुक्त सिंह यांनी प्रशासनाला दिले आहेत. हवामान खात्याच्या वतीने पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन देखील आयुक्त सिंह यांनी केले आहे.
साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी घरोघरी सर्वेक्षण करून आरोग्य तपासणी मोहीम राबविणे, धुरीकरण करणे, पावसामुळे शहरातील महत्वाच्या चौकांच्या ठिकाणी वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनासमवेत योग्य समन्वय ठेवून आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, आदी सूचना आयुक्त सिंह यांनी दिल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित झाली असून धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे. पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन देखील करण्यात आले आहे. तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर संबंधित विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महापालिका आपत्कालीन विभागाचे नियंत्रण अधिकारी अतिरिक्त आयुक्त चंद्रकात इंदलकर यांनी दिली.
महापालिका मुख्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून आयुक्त शेखर सिंह सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त विठ्ठल जोशी, निलेश भदाणे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल आदी अधिकाऱ्यांचे पथक शहरातील आपत्कालीन परिस्थितीची माहिती घेत असून आवश्यक सूचना नियंत्रण कक्षामार्फत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जात आहेत. दक्षतेच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले असून त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली जात आहे.
कोणतीही आपत्ती उद्भवल्यास नागरिकांनी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या ०२०-६७३३११११ किंवा ०२०-२८३३११११ या क्रमांकावर अथवा अग्निशमन विभागाच्या ७०३०९०८९९१ या मुख्य नियंत्रण कक्षाशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, पवना धरण सद्यस्थितीत ९९.४२ टक्के भरलेले असून पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता जलविद्युत केंद्रामधून विदुयतगृहाद्वारे १४०० क्युसेक्स व धरणाच्या सांडव्यावरून २१६० क्युसेक्स क्षमतेने नदीपात्रात विसर्ग चालू आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याने पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानुसार आज २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सांडव्याद्वारे होणा-या विसर्गामध्ये वाढ करून ४२६० क्यूसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. सांडव्यावरील विसर्गानंतर नदीपात्रामध्ये एकूण ५६६० क्यूसेक्स इतका विसर्ग सुरू झाला आहे. पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत, सखल भागातील सर्व नागरिकांना सूचना देण्यात याव्यात, सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घेत प्रशासनास सहकार्य करावे, असे जलसंपदा विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.